रासे येथे कचरा डेपोला विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रासे येथे कचरा डेपोला विरोध
रासे येथे कचरा डेपोला विरोध

रासे येथे कचरा डेपोला विरोध

sakal_logo
By

चाकण, ता. २५ : रासे (ता. खेड) येथील गायरान जमिनीत चाकण नगर परिषदेचा कचरा डेपो करण्यात येऊ नये, अशी रासे ग्रामस्थांची मागणी आहे.
चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ व खेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनी संयुक्तरित्या जागेची पाहणी केली. रासे गावाच्या गायरान जमिनीतील सुमारे पाच हेक्टर जागा चाकण नगर परिषदेच्या कचरा डेपोसाठी मागणी केलेली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी व खेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनी पाहणी केली.
नगरपरिषदेच्या कचरा डेपोसाठी रासे येथील गायरान जमीन मिळावी. चाकण नगर परिषदेची गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे. परंतु, ही जागा देण्यास रासे ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. या गायरान जागेशेजारी मोठ्या प्रमाणात वन विभागाचे जंगल आहे. या जागेपासून जवळ पुरातन रोटाई तळे आहे. शेजारी वन विभागाचा परिसर आहे. त्यामुळे वनविभाग नेमका ही जागा देण्याबाबत काय निर्णय घेतो, हे महत्त्वाचे आहे.
चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी सांगितले की, नगरपरिषदेच्या कचरा डेपो साठी हक्काची जागा मिळणे महत्त्वाचे आहे. रासे येथील गायरान जमीन ही कचरा डेपोसाठी योग्य आहे. पाच हेक्टर जागा मिळावी, अशी नगरपरिषदेची मागणी आहे. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. ज्या विभागांच्या परवानगी लागतात, त्यांना पत्रे देण्यात आलेली आहेत.
दरम्यान, रासे येथील सरपंच किरण ठाकर, माजी सरपंच विजय शिंदे यांनी सांगितले की, नगर परिषदेचा प्रस्तावित कचरा डेपोला रासे गावची गायरान जमीन देण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. या ठिकाणी कचरा डेपो झाल्यास वनविभागाचे जंगल असल्यामुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात धक्का पोहोचणार आहे. तसेच, वन्यप्राणी व जीवसृष्टीला धक्का पोहोचणार आहे. त्यामुळे काही झाले तरी आम्ही जागा देणार नाही. आंदोलने करून तीव्र विरोध करू.