
चाकण, महाळुंगे ठाण्याच्या हद्दीबाबत तक्रारी
चाकण, ता. ६ : खेड तालुक्यातील चाकण व महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या भौगोलिक हद्दनिश्चिती करताना नागरिकांच्या सूचना, तक्रारी व हरकतींचा विचार करावा, अशी मागणी होत आहे.
चाकण पोलिस ठाण्यातून विभक्त होऊन स्वतंत्र महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाणे सुरू झाले आहे. महाळुंगे एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीत ४८; चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत फक्त २३ गावे आहेत. चाकण पोलिस ठाण्याला भौगोलिक दृष्ट्या व नागरिकांच्या सोयीने जवळची असणारी गावे महाळुंगे पोलिस ठाण्याला जोडण्यात आलेली आहेत. महाळुंगे ठाण्याला पाईट चौकीची गावे जोडली आहेत. मात्र, पाईट पोलिस चौकी चाकण पोलिस ठाण्याच्या अंकित होती. चाकण पोलिस ठाण्याला भौगोलिक दृष्ट्या व नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने असणारी खराबवाडी, कुरुळी, मोई ही गावे महाळुंगे पोलिस ठाण्याला जोडली आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
याबाबत आमदार दिलीप मोहिते यांनीही, भौगोलिकदृष्ट्या तसेच नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने पोलिस ठाण्यांची हद्द निश्चिती ही चुकीची आहे. त्यामुळे याबाबत विचार करावा, अशी मागणी केली आहे. याबाबत ते उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत.
पोलिस ठाण्यांची हद्द निश्चिती आणि नागरिकांच्या दृष्टीने पोलिस ठाणे गैरसोयीचे वाटत असेल; तर त्याबाबत निश्चित विचार करण्यात येईल. पोलिस ठाण्याला जी गावी जवळची आहेत, ती गावे त्या पोलिस ठाण्याला निश्चित राहतील. जे पोलिस ठाणे भौगोलिकदृष्ट्या तसेच नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचे वाटते, ती गावे जवळच्या पोलिस ठाण्याला जोडण्यात येतील. याबाबत पुन्हा सर्वेक्षण केले जाईल.
- विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड