निर्यात बंदी केल्यानेच कवडीमोल विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्यात बंदी केल्यानेच कवडीमोल विक्री
निर्यात बंदी केल्यानेच कवडीमोल विक्री

निर्यात बंदी केल्यानेच कवडीमोल विक्री

sakal_logo
By

चाकण, ता. २८ : राज्यात सध्या कांदा कवडीमोल दराने विकला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांत सरकार विरोधात प्रचंड असंतोष निर्माण होत आहे. केवळ दोन ते पाच सहा रुपये प्रति किलोला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. केंद्र शासनाने कांद्याची निर्यात बंदी केल्यामुळे कांद्यास नीचांकी बाजारभाव मिळत आहे. असा आरोप, विरोधकांसह शेतकरी संघटना, शेतकरी यांच्याकडून होत आहे.

कांद्याला किमान २५ रुपयांच्या बाजारभाव मिळाला पाहिजे असे शेतकरी,व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश या देशातील आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे त्या देशांनी इम्पोर्ट ड्यूटी लावली असल्याने कांद्याची निर्यात या देशात कमी प्रमाणात होत आहे. कांद्याची निर्यात दुबई येथे थोड्याफार प्रमाणात होत आहे. इतर देशातील कांद्याची आवक होते. देशातील कांद्याला देशांतर्गत मागणी आहे; परंतु पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असल्याने कांदा दिवसेंदिवस कमी होत आहेत, असे एका व्यापाऱ्याने ''सकाळ''शी बोलताना सांगितले.

पुरवठा अधिक असल्याने भाव गडगडले
कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात आखाती प्रदेश व इतर देशात होते. सध्या निर्यात योग्य कांदा बाजारात येत नाही. निर्यातीसाठी वापरण्यात येणारा कांदा हा मोठा ४५ एमएमच्या पुढे असलेला, फिक्कट लाल रंगाचा, उग्र वासाचा व टिकाऊ असतो. तोच कांदा निर्यातदार कंपन्या, व्यापारी खरेदी करतात. पंचगंगा लाल कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी येत असल्याने व देशांतर्गत त्याची विक्री होत आहे. देशांतर्गत मागणी कमी आहे व पुरवठा अधिक आहे. यामुळे बाजारभाव गडगडला आहे.

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही सध्याच्या विक्रीतून वसूल होत नाही. अशी शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे. यावर्षी देशांतर्गत कांद्याचे भाव वाढण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीचे धोरण, व्यापारी धोरण बदलणे गरजेचे आहे, अशी मागणी शेतकरी, व्यापाऱ्यांची आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, देशातून कांदा निर्यातीला बंदी नाही. एप्रिल ते डिसेंबर २०२२ या काळात भारतातून ५२३.८ अब्ज डॉलर्सची कांदा निर्यात झाली आहे.कांदा बियाण्याच्या निर्यातीवर मात्र बंदी आहे.''


कांद्याचे पीक गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होते. त्याचबरोबर कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार, तामिळनाडू, ओडिसा या राज्यात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. देशांतर्गत कांद्याचे उत्पादन दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कांद्याचा पुरवठाही वाढत आहे. निर्यातयोग्य कांद्याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. त्यामुळे निर्यात ही कमी प्रमाणात होते आहे, असे निर्यातदार कंपन्या,व्यापारी यांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी कांदा पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहतो. पिकावर शेतकऱ्याची वर्षभरातील अर्थव्यवस्था अवलंबून असते. कांद्याचे भाव घसरले की त्याची अर्थव्यवस्था कोलमडते आणि तो उद्ध्वस्त होतो. पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यामधील आर्थिक स्थिती धोक्याची झाली आहे. त्याचा परिणाम कांदा निर्यातीवर झाला आहे. त्या देशात आयात कर वाढवला आहे. केंद्र सरकारने देशातील कांदा निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
- प्रशांत गोरे पाटील, कांदा व्यापारी, निर्यातदार