
कांद्याला वीस रुपयांचा हमीभाव द्यावा : घुमटकर
चाकण, ता.७ : कांद्याचे उत्पादन सध्या देशात तसेच राज्यात वाढले आहे. त्यात अवकाळी पावसाचाही फटका बसत आहे. कांद्याचा भाव घसरल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे सरकारने त्वरित कांद्याला वीस रुपये प्रतिकिलोला हमीभाव द्यावा.ज्यांनी कांदा विकला आहे त्यांना एक हजार रुपये अनुदान देण्याची मागणी मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करणार आहे, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी दिली.
चाकण (ता. खेड) येथील कृषी उत्पन्न बाजारात कांद्याला अगदी पाच ते चौदा रुपये प्रतीकिलोस प्रतवारीनुसार भाव एका किलोला मिळत आहेत. तो शेतकऱ्यांना परवडणारा नाही. सध्या उत्पादन खर्च हा दिवसेंदिवस वाढत आहे. एका क्विंटलला साधारणपणे शेतकऱ्याला पाचशे ते आठशे रुपये उत्पादन खर्च येतो आणि तेवढाच भाव जर मिळत असेल तर शेतकऱ्याला काहीच हातात मिळत नाही. यातून मालवाहतुकीचा खर्चही वसूल होत नाही, अशी खंत घुमटकर यांनी ''सकाळ''शी बोलून दाखविली.
विशेषतः खेड, शिरूर, मावळ तालुक्यातील शेतकरी तसेच उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतकरी, नगर, भागातील शेतकरी या बाजारात मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीस घेऊन येतात. कमी बाजारभावामुळे ते अगदी मेटाकुटीला येतात.
''नाफेड''ने परवडेल असा भाव द्यावा
नाफेडने तत्काळ कांदा खरेदी केंद्र चाकणला सुरू करून किमान शेतकऱ्याला परवडेल असा भाव द्यावा. चाकण बाजार हा मोठ्या प्रमाणात कांद्याचे आगार आहे. येथून कांदा परदेशातही निर्यात केला जातो. येथून देशांतर्गत मोठ्या प्रमाणात विक्री होते. दिल्ली बाजारात येथील कांदा मोठ्या प्रमाणात जातो.येथील बाजारातील चढ उतारावर देशातील कांद्याचे गणित अवलंबून आहे, असे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी सांगितले.