वणवे लावताना आढळल्यास कडक कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वणवे लावताना आढळल्यास कडक कारवाई
वणवे लावताना आढळल्यास कडक कारवाई

वणवे लावताना आढळल्यास कडक कारवाई

sakal_logo
By

चाकण, ता.१४ : चाकण, आळंदी (ता. खेड) वनविभागाच्या हद्दीत चाकण, आळंदी घाट रस्त्याच्या कडेला तसेच परिसरातील गावांच्या वनविभागात बेजबाबदार नागरिक कचरा गवतात टाकतात व तो पेटवून देतात. यामुळे आग पसरून त्याचा फटका जीवसृष्टी, पक्षीप्राणी, झाडे, झुडपे यांनाही बसत आहे. वणवे लावताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती चाकण वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांनी दिली.
वन विभागातर्फे चाकण परिसरात फलकांद्वारे वणवे रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. वनविभागाच्या हद्दीत काहीजण सिगारेट, बिड्या ओढून त्या गवतात टाकतात. काही तरुण जाणून-बुजून वनविभागाच्या हद्दीत पार्ट्या करतात. खाद्यपदार्थ बनविण्यासाठी लाकूड जळण म्हणून वापरतात. अशावेळी जळते लाकूड न विझवल्यास परिसरात आग पसरते. असे प्रकार आढळून आल्यास स्थानिक नागरिकांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.
आळंदीचे वनपाल जाधवर यांनी सांगितले की, चाकण, आळंदी वनक्षेत्राभोवती जाळ रेषा घेतली आहे. गावोगावी जाऊन वणवे लावू नयेत, वनाचे संरक्षण करावे असे फ्लेक्स लावून जनजागृती केली आहे. चिंबळी येथे वनविभागाच्या हद्दीत काही दिवसापूर्वी आग लागली होती. त्यावेळी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी तेथे पोहोचून रोजंदारी वन मजुरांच्या साह्याने ब्लोअर मशिनच्या साहाय्याने लवकर आग आटोक्यात आणली.

श्रमदानातून वारंवार कचऱ्याची विल्हेवाट
वणवामुक्त जंगल अंतर्गत आदर्श वनग्राम स्पर्धा २०२३ मध्ये ग्रामपंचायतींना सहभागी करून आयोजित केली आहे. चाकण -आळंदी मार्गांवरील चाकण-आळंदी घाट परिसरात काही लोक, हॉटेल व्यावसायिक, काही कंपन्या जाणून बुजून रात्री अपरात्री कचरा टाकतात. तो कचरा काही लोक पेटवून देतात, त्या कचऱ्यामुळे नेहमीच वणवा लागण्याची शक्यता असते. काही वेळा वणवे लागतात. त्यामुळे चाकण-आळंदी मार्गांवर टाकलेला कचरा श्रमदानातून वारंवार उचलून त्याची विल्हेवाट लावली जात आहे.


...........
चाकण, आळंदी वनविभागाच्या हद्दीत वणवा लागू नये. यासाठी व वणवे रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतु काही लोक जाणून-बुजून वणवे लावत आहेत. यामुळे वनसंपदा नष्ट होत आहे. त्यांच्याबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी माहिती वनविभागाला द्यावी.
- योगेश महाजन, अधिकारी, चाकण वनविभाग