
चाकण चौऱ्याऐशी, धन्य देहूगाव, तेथील जन्म हाची आम्हा पुण्यठाव या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांनी गौरविलेल्या आध्यात्मिक, धार्मिक ऐतिहासिक व आधुनिक काळात औद्योगिक परंपरा लाभलेल्या चाकण औद्योगिक नगरीचे व परिसराचे श्री चक्रेश्वर हे पुरातन असे श्रद्धास्थान आहे. हे तीर्थक्षेत्र पुरातन आहे. या तीर्थक्षेत्राच्या परिसरात वराह व कासव यांच्या पुरातन दगडी मूर्ती आहेत.
या मूर्ती प्राच्यविद्या तज्ज्ञांच्या मते सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. याला दुजोरा म्हणजे मुंबई विद्यापीठाचे प्राच्यविद्या विभागाचे प्रमुख श्री. आपटे व त्यांचे सहकारी यांनी या तीर्थक्षेत्राला भेट दिली असता त्यांनी ही माहिती आम्हा ग्रामस्थांना दिली. यानंतरच्या काळामध्ये श्री संत ज्ञानेश्वर, जगद्गुरू तुकाराम महाराज, संताजी महाराज जगनाडे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. युगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरीवर झाला आहे. वयाच्या सातव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांची माता जिजाऊमाता यांच्या समवेत शिवनेरी ते पुणे येथे जात असतात. दरम्यानच्या प्रवासात ते चाकण येथील इतिहास प्रसिद्ध असलेल्या किल्ले संग्रामदुर्ग येथे राहिलेले होते. वास्तव्याच्या त्या काळात त्यांनी श्री चक्रेश्वर महाराजांची महापूजा केलेली आहे. या घटनेस इतिहासाचे दाखले आहेत.
अशा आध्यात्मिक ऐतिहासिक भूमीला अलीकडच्या काळात चाकण हे या भारतातील सर्वात मोठे औद्योगिक केंद्र झाल्याने देशातील सर्व भागातील अनेक नागरिक उद्योग, व्यवसायानिमित्त कामानिमित्त या नगरीत राहत आहेत. खऱ्या अर्थाने ही नगरी आता औद्योगिक नगरी म्हणून देशात प्रसिद्धीस आलेली आहे. अशा या औद्योगिक चाकण नगरीत सर्व धर्म, सर्व जाती यांच्या विरंगुळ्याचे एकमेव रम्य ठिकाण श्री चक्रेश्वर मंदिर व त्याचा निसर्गरम्य परिसर आहे. ‘निसर्गवृद्धी ही परमेश्वराची भक्ती’ पर्यावरणाचा समतोल हीच मानवी सेवा हे ध्येय उराशी बाळगून श्री चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट व सर्व भाविक या भावनेने या ठिकाणी या स्थळाची पावित्र्यात, स्वच्छता व सुरक्षितता राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
आध्यात्मिक दृष्ट्या या स्थळाचे विशेष वैशिष्ट्य, असे या स्थळात नेमाने दरवर्षी महाशिवरात्रीपर्वात अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत असतो. त्याचबरोबर विशेष बाब म्हणजे दर तीन वर्षांनी येणाऱ्या पुरुषोत्तम मासामध्ये अधिक मास अखंड हरिनाम पुरुषोत्तम मास जवळजवळ ३१ दिवसांचा संपन्न होत असतो. या आध्यात्मिक उपक्रमाची स्थापना व सुरुवात ह.भ.प कोंडाजी महाराज डेरे, ह.भ.प सहादू बाबा वायकर (दोघेही रा. जुन्नर) नारायण हरी वाघ यांनी केली आहे. आध्यात्मिक उपक्रम अखंडपणे गेली ९३ वर्ष या ठिकाणी कीर्तन सोहळ्याने व हरिनामाने संपन्न होत आहे.
हा परिसर वृक्षवल्लीमुळे निसर्गरम्य
मानवतेच्या या सोहळ्यात सर्व धर्म, सर्व जाती हे चाकणच्या परिसरातील औद्योगिक नगरीमध्ये वास्तव्यात असलेले देशाच्या कानाकोपऱ्यातील भाविक मोठ्या श्रद्धेने सामील होत असतात. याचा अभिमान आम्हा चाकणकरांना आहे. या परिसरातील निसर्ग वृद्धी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निरनिराळ्या वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. खऱ्या अर्थाने हा परिसर या वृक्षवल्लीमुळे निसर्गरम्य झालेला आहे. या परिसरात स्मशानभूमी असून या स्मशानभूमीची वैशिष्ट्य म्हणजे ज्या धर्माचे ज्या जातीचे व ज्या समाजाचे अंत्यविधी दहन पद्धतीने येथे होतात. त्या सर्वांसाठी या ठिकाणी कोणताही भेदाभेद न करता अंत्यविधी होतात. या स्मशानभूमीत खऱ्या अर्थाने स्मशानातून स्वर्गाची निर्मिती झालेली आहे. अशी भावना अनेक लोक व्यक्त करतात.
३१ दिवसांचा आध्यात्मिक महोत्सव
गेल्या १०-१२ वर्षांपूर्वी या स्थळाला महाराष्ट्र शासनाने तीर्थक्षेत्र योजने अंतर्गत तीर्थक्षेत्र ‘क’वर्ग चा दर्जा दिल्याने अनेक सुविधा, भाविक, भक्तांसाठी व मोठ्या श्रध्येने येणाऱ्या भक्तांसाठी निर्माण झालेल्या आहेत. हे स्थळ मानवतेचे महान मंदिर असल्याचे आम्हा चाकणकरांची भावना आहे. भाविक भक्तांच्या सोयी, सुविधा
निर्माण करण्याचे प्रयत्न, या स्थळाचा आध्यात्मिक वारसा जपण्याची जबाबदारी ही चाकण व चाकण परिसरातील सर्व भाविक भक्तांची आहे. तसा प्रयत्न सर्व भाविक, भक्त करीत आहे. याचा आम्हाला आनंद आहे. चाकण नगरीचा हा आध्यात्मिक वारसा तरुण पिढीने विशेषतः: सुशिक्षित तरुण पिढीने पुढे चालवावा, अशी आमची वडील मंडळीची भावना आहे. अलीकडच्या काळात म्हणजे गेल्या महिन्यात पुरुषोत्तम मास मध्ये संपन्न झालेला अखंड हरिनाम पुरुषोत्तम मास हा ३१ दिवसांचा आध्यात्मिक महोत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहाने व भव्य दिव्यप्रमाणात पार पडला. यामध्ये तरुण वर्गाचा फार मोठा सहभाग होता. हे मोठ्या आनंदाने सांगावेसे वाटते.
सौजन्य
श्री चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, मा. आमदार अॅड . राम कांडगे, गोपाळशेठ जगनाडे, शिवाजी धों. जाधव, प्रदीप भुजबळ तुषार मांजरे, राजेंद्र शिंदे, अनिल देशमुख, अॅड. नीलेश कड, अमोल जाधव, बाळासाहेब गायकवाड, प्रवीण गोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.