रिंगरोड बाधितांना मिळणार सर्वाधिक सहा कोटींचा भाव

रिंगरोड बाधितांना मिळणार सर्वाधिक सहा कोटींचा भाव

चाकण, ता. १३ : खेड तालुक्यातील १३ गावांतून रिंगरोड जात आहे. बाधित होणाऱ्या जमिनींची भूसंपादनाची प्रक्रिया जिल्हा महसूल प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. खेड तालुक्यातील चिंबळी, कुरुळी या गावात प्रती हेक्‍टरी सुमारे सहा कोटी भाव देण्यात आला आहे. मोबदल्याचे वाटप दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील काही शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे, तर काही शेतकरी अजूनही रिंगरोडच्या विरोधात आहेत.

खेड तालुक्यात पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्ग, चाकण -तळेगाव,चाकण- शिक्रापूर या मार्गांची कामे गेल्या अनेक वर्षांपासून ठप्प झाली आहेत, परंतु रिंगरोडसाठी जमीन संपादन प्रक्रिया वेगात सुरू आहे. शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. काहींना नोटिसा देण्याचे काम प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. शासनाने दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांनी संपादनासाठी संमती पत्र दिले, तर शेतकऱ्यांना अधिकची २५ टक्के रक्कम मोबदला म्हणून देण्यात येणार आहे.

खेड तालुक्यातील बारा गावांत सुमारे ६१४ गटांमध्ये तब्बल २९२ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. यामध्ये खालुंब्रे, निघोजे, कुरुळी, चिंबळी, मोई, निघोजे, केळगाव, चऱ्होली खुर्द, धानोरे, मरकळ, सोळू, गोलेगाव या गावामध्ये रिंग रोडसाठी जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. जमींनीचे संपादन करताना शेतकऱ्यांना योग्य तो भाव देण्यासाठी गावातील मागील तीन वर्षांतील जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार, रेडी रेकनरचे दर लक्षात घेऊन दर निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक दर चिंबळी, कुरुळी येथे प्रती हेक्टरी सहा कोटी रुपये, खालुंब्रे चार कोटी, चऱ्होली खुर्द येथे चार कोटी मिळणार आहेत.
------------------------
रिंगरोडला जमीन देण्यास आमचा तीव्र विरोध आहे. प्रशासनाने नोटिसा काढल्या असल्या तरी आम्ही जमीन संपादनाला संमती देणार नाही. रिंगरोडमुळे शेतकरी भूमिहीन होणार आहे. प्रशासनाने निश्चित केलेले दर अतिशय कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना भिकेला लावणारा हा रिंगरोड आहे. सरकारने अगोदर पुणे -नाशिक महामार्ग, चाकण-तळेगाव, चाकण -शिक्रापूर या मार्गाची कामे करावीत. - पाटीलबुवा गवारी, रिंग रोड बाधित शेतकरी, मोई, ता. खेड
-------------------------
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रिंगरोडची खेड तालुक्यात गरज नाही. सध्या पुणे-नाशिक महामार्ग, चाकण -तळेगाव, चाकण -शिक्रापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या मुख्य मार्गांची कामे अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. ती शासनाने करावीत. रिंगरोड करून खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी घ्यायच्या, त्यांना भूमिहीन करायचे. खेड तालुक्यातील जमिनी अनेक प्रकल्पासाठी यापूर्वी बाधित झालेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीने काय करायचे हा आमचा सवाल आहे. - राम गावडे, रिंग रोड बाधित शेतकरी
.....

जिल्हा महसूल प्रशासनाने भूसंपादनाची प्रक्रिया वेगात सुरू केली आहे. त्यामुळे संपादित जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. चिंबळी, कुरुळी या गावातील मोबदला सर्वाधिक सहा कोटी रुपये आहे. खेड तालुक्यात रिंगरोड बाधित शेतकऱ्यांना सुमारे अंदाजे दीड हजार कोटींचे वाटप विविध टप्प्यात होणार आहे. -जोगेंद्र कट्यारे, प्रांताधिकारी, खेड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com