निर्यातबंदी उठविल्याने शेतकरी, व्यापाऱ्यांत समाधान
चाकण, ता.१९ : केंद्र सरकारने तीन महिन्यांपूर्वी कांदा निर्यातबंदी केली होती. त्यास शेतकरी, संघटना आणि व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध करीत ठिकठिकाणी आंदोलने केली होती. विविध बाजार समितीत झालेले कांद्याचे लिलाव ठप्प झाले होते. कांद्याच्या बाजारभावात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. यामुळे अखेर केंद्र सरकारला निर्यात बंदी उठवावी लागली.या निर्णयामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
केंद्र सरकारने कांद्याचे किरकोळ बाजारात वाढलेले बाजारभाव सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा दरात नियंत्रित आणण्यासाठी महागाईचा मुद्दा लक्षात घेऊन आठ डिसेंबर २०२३ रोजी निर्यातबंदी केली होती. ही बंदी ३१ मार्चपर्यंत असेल, असे परकीय व्यापार महासंचलनालयाने जाहीर केले होते. बंदीमुळे कांद्याचे घाऊक बाजारात अगदी वीस ते पंचवीस रुपये प्रतिकिलोने बाजारभाव कोसळले होते, असे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे, बाजार समितीचे संचालक माणिक गोरे, महेंद्र गोरे यांनी सांगितले.
भारतीय कांद्याला सध्या परदेशात मोठी मागणी आहे. केंद्राने निर्यातबंदी उठवल्यामुळे शेतकरी, निर्यातदार कंपन्या, व्यापाऱ्यांसाठी परदेशातील महत्त्वाची बाजारपेठ खुली होणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात देशातील कांद्याला अधिक बाजारभाव मिळेल, असे कांदा निर्यातदार, व्यापारी प्रशांत गोरे पाटील यांनी सांगितले.
बंदीबाबत अटी, शर्ती काय?
कांदा निर्यातीवर असलेले चाळीस टक्के निर्यातशुल्क कमी होणार का? असा सवाल निर्माण होत आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवली तरी याबाबतीत अटी, शर्ती काय असतील हे पाहणेही महत्त्वाचे आहे.
- कैलास लिंभोरे, सभापती, खेड कृषी उत्पन्न बाजार समिती
बाजारभाव दहा रुपयांनी वाढण्याची शक्यता
देशांतर्गत कांद्याची खरेदी- विक्री होत असल्यामुळे कांद्याचे बाजारभाव दिवसेंदिवस घसरत होते.अगदी घाऊक बाजारात प्रतिकिलोला बाजारभाव नऊ ते १६ रुपये किलोपर्यंत गेले आहेत . राज्यात चाकण ही प्रसिद्ध कांद्याची बाजारपेठ आहे. येथील मोठ्या प्रमाणात गरवा जातीचा कांदा परदेशात निर्यात होतो.रब्बी हंगामातील तसेच उन्हाळी कांदा निर्यातीसाठी योग्य असल्याने निर्यातदार कंपन्या,निर्यातदार मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करतात. त्यामुळे येथील कांद्याचे बाजारभाव वाढतात. निर्यात बंदी उठल्यामुळे कांद्याचे बाजारभाव सध्या तरी पाच ते दहा रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे, असे कांदा व्यापारी विक्रम शिंदे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.