मतोत्स्वाची लगीनघाई

मतोत्स्वाची लगीनघाई

चाकण, ता. १३ : शिरूर लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान झाले. उन्हाची तीव्रता व काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे मतदारांचा उत्साह कमी झाला नाही. काही मतदान केंद्रामध्ये मतदारांच्या रांगा असल्यामुळे उशिरापर्यंत मतदान चालू राहिले. नवमतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात जाणवत होता. काही ठिकाणी सेल्फी पॉइंट केले होते. त्या ठिकाणी नवमतदार, तरुण, तरुणी, कुटुंबातील व्यक्ती, पती- पत्नी जाऊन सेल्फी काढत होते. त्यांचा उत्साह जाणवत होता.
शिरूर मतदारसंघात असलेल्या ३२ उमेदवारांची यादी मतदान यंत्रावर असल्यामुळे उमेदवाराचे नावे शोधताना मतदारांना अवघड होत होते. तसेच, काही ठिकाणी वीजपुरवठा नसल्यामुळे अंधार असल्यामुळे मतदारांना लवकर मतदान करता येत नव्हते, अशीही परिस्थिती होती. शहराच्या ठिकाणी मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. मतदान वेळेवर होत नव्हते. त्यामुळे मतदार संताप व्यक्त करत होते, असेही चित्र होते.
मतदानासाठी प्रशासनाने तसेच पोलिसांनी, राखीव जवानांनी हत्यारबंद चोख बंदोबस्त ठेवला होता. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४३.८९ टक्के मतदान झाले होते, अशी माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली.
काहींची नावे मतदार यादीतून गायब होती. त्यामुळे अनेकांना मतदान करता आलेले नाही. अनेक वर्ष मतदान करणारे चाकण येथील ८४ वर्षे वयाचे ज्येष्ठ नागरिक साहेबराव देशमुख यांनी सांगितले की, मी अनेक वेळा मतदान केलेले आहे. परंतु मतदार यादीतून माझे नाव गायब असल्यामुळे मला यावेळी मतदान करता आले नाही, ही खंत मला आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या मतदारसंघात शिरूर, आंबेगाव, खेड-आळंदी, जुन्नर, हडपसर व भोसरी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण २५ लाख ३९ हजार ७०२ मतदार संख्या आहे. त्यामध्ये १३ लाख ३६ हजार ८२० पुरुष, तर बारा लाख दोन हजार ६७९ महिला मतदार आहेत. तृतीयपंथी २०३ मतदार आहेत. लोकसभा मतदार संघात एकूण २५०९ मतदान केंद्र होती.
जुन्नर विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख १२ हजार दोनशे पाच मतदार आहेत. सकाळी सात ते नऊ या वेळात जुन्नर विधानसभा मतदारसंघात ५.४९ टक्के मतदान झाले. हा आकडा वाढत गेला. येथे दुपारी तीनच्या सुमारास ४१.४१ टक्के मतदान झाले व सायंकाळी पाच वाजता ४७.३१ टक्के मतदान झाले.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख २१०१ मतदार आहेत. येथे सकाळी सात ते नऊ या वेळेत ६.५४ टक्के मतदान झाले. दुपारी तीनच्या सुमारास ४४.८८ टक्के मतदान झाले, तर सायंकाळी पाच वाजता ५३.७१ टक्के मतदान झाले.
खेड -आळंदी विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख ५२ हजार ६३४ मतदार आहेत. सकाळी सात ते नऊ या वेळेत ४.६३ टक्के मतदान झाले. मतदानाचा आकडा दिवसभर वाढत गेला. दुपारी तीन वाजता ३७.७६ टक्के मतदान झाले. सायंकाळी पाच वाजता ४८.०७ टक्के मतदान झाले.
शिरूर विधानसभा मतदारसंघात एकूण चार लाख ३९ हजार २७६ मतदार आहेत. सकाळी सात ते नऊ या वेळात ४.३२ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदान वाढत गेले दुपारी तीन वाजता ३४.९५ टक्के मतदान झाले. सायंकाळी पाच वाजता ४१.१५ टक्के मतदान झाले. भोसरी विधानसभा मतदारसंघात एकूण पाच लाख ५१ हजार ५८२ मतदार आहेत. सकाळी सात ते नऊ या वेळेत ४.२१ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदान वाढत गेले. दुपारी तीन वाजता ३२.७७ टक्के मतदान झाले. सायंकाळी पाच वाजता ४२.२४ टक्के मतदान झाले.
हडपसर विधानसभा मतदारसंघात एकूण पाच लाख ८१ हजार ९०४ मतदार आहेत. सकाळी सात ते नऊ या वेळेत ५.२३ टक्के मतदान झाले. त्यानंतर ११ वाजता १४.४ टक्के मतदान झाले. दुपारी तीन वाजता ३३.१७ टक्के मतदान झाले आणि सायंकाळी पाच वाजता ३८.४ टक्के मतदान झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com