

चाकण, ता. 2९ : औद्योगिक वसाहतीत तसेच चाकण, महाळुंगे परिसरात गुन्हेगारी वाढत आहे. महाळुंगे येथे मागील महिन्यात गुन्हेगारांनी केलेला हवेत गोळीबार, असे प्रकार वाढत आहेत. या वाढत्या घटनांमुळे नागरिकांत, कामगारांत दहशत व भीती निर्माण झालेली आहे. अल्पवयीन मुलांची वाढती गुन्हेगारी वाढते खून यामुळे परिसरात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे.
चाकण (ता. खेड) येथील औद्योगिक वसाहत तसेच चाकण, महाळुंगे, निघोजे, कुरुळी परिसर हा मोठा परिसर असल्याने या परिसरात दिवसाढवळ्या व रात्रीच्या वेळी वर्दळीच्या ठिकाणी खून होत आहेत. अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खंडणी, अपहरण, हप्ते मागणे, धमकी, हाणामारी असे प्रकारे वाढले आहेत. हे प्रकार वाढल्याने नागरिक, कामगार, उद्योजक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चाकण, महाळुंगे परिसरात ठेकेदारीवरून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तसेच खंडणीचे प्रकार वाढलेले आहेत. यामुळे गुंडगिरी दहशत वाढते आहे. त्याचा परिणाम औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांवरही होत आहे. भंगार व्यवसाय व कामगारांची ठेकेदारी यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. कंपनीत ठेके मिळविण्यासाठी मोठी रस्सीखेच प्रमाण वाढले आहे. हे वाढत असताना गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी किती प्रयत्न करतात. हा ही सवाल निर्माण होत आहे.
चाकण, महाळुंगे परिसरात अवैध धंदे वाढत आहेत. गांजा, बेकायदा दारू विक्री केली जात आहे. अल्पवयीन मुले गांजाचे सेवन मोठ्या प्रमाणात करून गुन्हेगारी करत आहेत, असेही भयानक वास्तव आहे. जे कामगार, इतर लोक प्लॉट घेऊन घरांची कामे करतात, त्यांच्याकडून खंडणी, हप्ता मागण्याच्या टोळ्या कार्यरत आहेत. खंडणी, हप्ता दिला नाही तर त्यांना हाणामारी, दमदाटी होते, असे प्रकार घडत आहेत.
अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी वाढली
चाकण, महाळुंगे परिसरात अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी वाढली आहे. ही गुन्हेगारी धोकादायक आहे. त्यातून खुनाचे प्रकार घडत आहेत. या परिस्थितीवर पोलिसांचे अजिबात लक्ष नाही. त्यामुळे कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे, असा आरोप नागरिक, कामगारांचा आहे. गावठी कट्टे, पिस्तूल मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार येथून आणले जातात. गावठी कट्टे, पिस्तूल अगदी कमी रकमेत मिळतात. त्यामुळे ते विकणारी व घेणारी टोळी मोठ्या प्रमाणात चाकण औद्योगिक वसाहतीत चाकण-महाळुंगे परिसरात कार्यरत आहे. त्यामुळे गुन्हेगारांकडे गावठी कट्टे, पिस्तूल सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे.
चाकण, महाळुंगे परिसरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. तडीपारी, मोका, एमपीडीए यासारख्या कारवाई गुन्हेगारांवर करण्यात येत आहे. अवैध धंद्यावर कारवाई करण्यात येत आहे.
- डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.