चाकणला विना परवाना रिक्षांचालकांची दादागिरी

चाकणला विना परवाना रिक्षांचालकांची दादागिरी
Published on

चाकण, ता. १० : येथील तळेगाव चौकात, आंबेठाण चौकात, माणिक चौकात विना परवाना रिक्षाचालकांचा सुळसुळाट वाढला असून, त्यांच्याकडून दादगिरीचेही प्रकार उघडकीस येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रवासी घेण्यावरून वादविवाद तसेच हाणामारीचे प्रकार घडत आहेत. गुन्हेगार प्रवृत्तीचे अनेक परप्रांतीय बनावट क्रमांकाच्या चालवीत आहेत. याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याची चर्चा सुरु आहे.
चाकण- भोसरी, चाकण- तळेगाव, चाकण- शिक्रापूर तसेच औद्योगिक वसाहतीत या अवैध रिक्षांना ऊत आला आहे. प्रवासी घेण्यावरून रिक्षाचालकांत वादविवाद, तसेच हाणामाऱ्यांत वाढ होत आहे. त्याचा अन्य वाहनचालक, प्रवासी, पादचारी, कामगार, व्यावसायिक यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. अनेक रिक्षा या विनापरवाना धावत असून, त्यामागे मोठे अर्थकारण चालत असून, त्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या परप्रांतीय रिक्षाचालकांची संख्या अधिक आहे. काही रिक्षांच्या सीटखाली लाकडी दांडकी, लोखंडी रॉडही ठेवलेले आढळून येत आहेत. काहीवेळा पोलिसांकडून बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई केली जाते परंतु परिस्थिती ‘जैसे थे’ होते.
तळेगाव चौकात एक रिक्षाचालक थांबला असताना दुसरा रिक्षाचालक तेथे आला व प्रवासी घेऊ लागला. त्याला विरोध केला असता त्याने दोन साथीदारांसह मिळून पहिल्या रिक्षाचालकाला मारहाण केली. ही घटना मंगळवारी (ता. ८) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. तर काही महिन्यांपूर्वी एका रिक्षाचालकाने तरुणीला चाकूचा धाक दाखवला होता. असे प्रकार वारंवार घडत आहेत. काही बेशिस्त रिक्षाचालक रस्त्यावर अस्ताव्यस्त रिक्षा उभ्या करतात, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत व वाहतूक कोंडीत भर पडते. प्रादेशिक परिवहन विभाग तसेच पोलिसांनी अशा बेशिस्त तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

विनापरवाना रिक्षाचालक तसेच अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात येते. जे रिक्षाचालक वादविवाद, हाणामारी करतात त्यांना समजही दिली जाते, वेळप्रसंगी कारवाईही केली जाते. रिक्षाचालकांमध्ये शिस्त आणण्याचे काम पोलिस करत आहेत.
- प्रकाश राठोड, पोलिस उपनिरीक्षक, चाकण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com