बाजारभाव गडगडल्याने उत्पादकांच्या चिंतेत वाढ
चाकण, ता. ७ : कांद्याचे बाजारभाव राज्यासह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये गडगडला आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सध्या घाऊक बाजारात प्रतिकिलोसाठी फक्त सहा ते १२ रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. यातून उत्पादन खर्चही वसूल नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कांद्याच्या निर्यातीवरील निर्यात शुल्क केंद्र सरकारने रद्द केल्यामुळे निर्यात वाढेल असे चित्र होते, परंतु त्या प्रमाणात निर्यातीमध्ये वाढ झाली नाही. मागील महिन्यात २२ मार्चला केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील वीस टक्के शुल्क पूर्णपणे रद्द केले. त्यानंतर निर्यात वाढेल, अशी अपेक्षा शेतकरी, व्यापाऱ्यांची होती. मात्र, केंद्र सरकार अन् कांदा आयात करणारे देश यांची बदलती धोरणे त्यामुळे कांदा निर्यातीस सध्या अल्प प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे देशांतर्गत कांदा विक्री झाल्यामुळे प्रत्येक बाजारात कमी बाजारभाव मिळत आहे. परिणामी प्रतिक्विंटलला शेतकऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयाचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
राज्यात कांद्याचे उत्पादन यावेळी अधिक आहे. केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने कांदा उत्पादकांना कांद्याच्या उत्पादन खर्चापेक्षा अधिक भाव देणे गरजेचे आहे अशी मागणी शेतकऱ्यांची, शेतकरी संघटनांची अनेक वर्षापासून आहे परंतु त्याबाबत सरकार काही निर्णय घेत नाही.
- गजानन गांडेकर, सदस्य, शेतकरी संघटना
शेतकरी राम गोरे, सुभाष पवळे म्हणाले...
१. सध्या उन्हाळा हंगामातील कांद्याची काढणी सुरू आहे.
२. काढणीनंतर कांदा वखारीत न साठवता लगेच बाजारात विक्रीसाठी आणावा लागतो
३. विविध बाजारात आवक वाढल्याने बाजारभावात घट.
४. मागील तीन महिन्यापासून बाजारभाव घसरले आहेत.
५. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटलला हजार ते दीड हजार रुपये आर्थिक नुकसान
या देशांतून मागणी अल्प प्रतिसाद
- बांगलादेश
- इजिप्त
- श्रीलंका
- सिंगापूर
- मलेशिया
- आखाती प्रदेश
- दुबई
पाकिस्तान युद्धाचा निर्यातीवर परिणाम
बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे बांगलादेशातील निर्यात ८० टक्क्यांनी घटलेली आहे. बांगलादेशात स्थानिक परिसरातील कांदा विक्रीसाठी येत आहे. सध्या भारत पाकिस्तानमध्ये युद्धसदृश्य परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम झाला आहे, असे कांदा निर्यातदार व्यापारी, निर्यातदार कंपन्या यांचे म्हणणे आहे. कांद्याची निर्यात घटल्यामुळे कांद्याची देशांतर्गत सध्या विक्री होत आहे.
चाकण बाजारात सुमारे पाच हजार क्विंटल वर कांदा विक्रीसाठी येत आहे. परंतु बाजारभाव सध्या १२ ते १३ रुपये प्रतिकिलोला मिळत आहे. कमी भावामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे निर्यात वाढणे गरजेचे आहे.
- विजय शिंदे, सभापती, खेड कृषी उत्पन्न बाजार समिती
कांद्याचे प्रतिकिलोचे किमान, कमाल बाजारभाव (रुपयांत)
मुंबई...............८ ते १६
पुणे...............९ ते १५
नाशिक...............६ ते १३
चाकण...............८ ते १२
अहिल्यानगर...............६ ते १४
कोल्हापूर...............८ ते १८
सातारा............... ५ ते १४
सोलापूर...............७ ते १६
छत्रपती संभाजीनगर...............६ ते १२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.