काळुसच्या टेमगिरवाडीच्या रस्त्याचा प्रश्न सुटेना
चाकण, ता. १७ : चाकणपासून सुमारे सात किलोमीटरजवळ असलेल्या काळूसच्या (ता. खेड) टेमगिरवाडी गावच्या रस्त्याचा प्रश्न सुटता सुटत नाही. प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक, प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. शेतकऱ्यांना शेतीमाल चाकण बाजारात आणण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पवळेवस्तीतर्फे काळूस ग्रामीण मार्ग ९७ म्हणून कागदोपत्री नोंद आहे. प्रजिमा ७२ चा जोड रस्ता, गावचा मुख्य रस्ता आहे. अनेकदा निधी मंजूर झाला. परंतु जागेच्या अडचणीमुळे काम अपूर्णच आहे. टेमगिरवाडी गावठाण ते पोटवडेवस्तीकडे (प्रजिमा २०) जाणारा हा रस्ता आहे. ग्रामपंचायत नमूना २३ ला नोंद असलेला रस्ता आहे. रोजगार हमी योजनेत यापूर्वी या रस्त्याचे काम झाले होते. महाराजस्व अभियानांतर्गत २०१७ मध्ये खेडचे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी या रस्त्याची स्थळ पाहणी केली होती. शासकीय निधीतून काही प्रमाणात रस्त्याचे काम झाले आहे. आवश्यक तिथे साकव पुलाचे काम झाले. परंतु अद्याप उर्वरित रस्ता अर्धवटच आहे.
टेमगिरवाडी (कौटकरवाडी)-आगरकरवाडीतर्फे चाकणकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्याचे काळूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत काँक्रिटीकरण काम पूर्ण झाले आहे. परंतु चाकण नगरपरिषदेच्या हद्दीत जागेअभावी रस्ता रखडला आहे. टेमगिरवाडीतर्फे (काळूस) वाकी खुर्द (चाकण) रस्ता हा रस्ताही निधीची कमतरता असल्यामुळे रस्त्याचे काम होत नाही हे चित्र आहे.
अशी आहे सध्याची स्थिती
१. चाकण सारख्या प्रगत शहरालगत टेमगिरवाडी असूनही टेमगिरवाडी परिसराची अवस्था बेटासारखी
२. गावाबाहेर जाण्यासाठी तीन ठिकाणाहून मार्ग असले तरी एकही पक्क्या स्वरूपाचा रस्ता नाही.
३. बऱ्याच वेळा निधी मंजूर झाला परंतु जागेच्या अडचणीमुळे काम रखडले.
४. पूर्वापार वहिवाटीचे, नोंदीतले रस्ते आहेत, परंतु हद्दीच्या वादावर सामंजस्याने तोडगा निघेना
५. कायदेशीर कारवाई करण्यासाठी लोकप्रतिनिधी मतपेटीचे गणित बिघडू नये म्हणून स्पष्ट भूमिका घेईनात
कायद्यानुसार रस्ता खुला करण्यासाठी
काही नेत्यांनी अनेकदा या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला. सरकारी नोंदीतले रस्ते असूनही काही जागामालक ऐकत नाहीत. ते विरोध करतात. रस्ता खुला करण्यासाठी वाद होतात. प्राथमिक जबाबदारी म्हणून ग्रामपंचायतीने कायद्यानुसार रस्ता खुला करण्यासाठी तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करून रस्ते खुले केले पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक पातळीवर मतपेटीचे गणित बिघडू नये म्हणून ग्रामपंचायत कारवाईसाठी पाठपुरावा करत नाही तसेच लोकप्रतिनिधींमधील इच्छाशक्तीच्या अभावामुळे रस्त्याचे प्रश्न सुटत नाही.राजकीय हित बाजूला ठेऊन याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
- सूरज कौटकर, स्थानिक शेतकरी
रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अनेक छोटे-मोठे अपघात झाले असून, रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात अनेकदा मागणी केली आहे. वेळप्रसंगी आंदोलनेही केली तरी सुद्धा प्रश्न मार्गी लागला नाही.
- संदीप टेमगिरे, स्थानिक शेतकरी
08484
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.