चाकण नगरपरिषदेचा बेकायदा प्लॉटिंगला चाप
चाकण, ता. २५ : चाकण (ता. खेड) परिसरात, तसेच औद्योगिक वसाहतीजवळील गावात मोठ्या प्रमाणात बेकायदा प्लॉटिंगला ऊत आला आहे. बेकायदा प्लॉटिंगचे झोन दाखले बनावट दाखवून नागरिकांची, कामगारांची, गुंतवणूकदारांची अक्षरशः आर्थिक फसवणूक होत आहे. मात्र, आता चाकण नगरपरिषदेकडून बेकायदा प्लॉट खरेदी करणाऱ्यांना ते खरेदी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आता नगरपरिषदेच्या हद्दीतील बेकायदा प्लॉटिंगला चाप बसणार आहे.
येथील नगर परिषदेच्या हद्दीत अनेक जण बेकायदा प्लॉट विक्री करतात. बनावट झोन दाखले दाखवतात. एक प्लॉट अगदी दोन ते चार जणांना विकला जातो. नागरिक, कामगारांची, गुंतवणूकदारांची, मुंबईतील चाकरमान्यांची, तसेच नाशिक, धुळे, जळगाव, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, मराठवाड्यातील, पुणे, पिंपरी- चिंचवड या भागातील काही गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करतात. प्लॉट डेव्हलपमेंट करतात. त्यावर सांडपाणी कुठे जाईल याची व्यवस्था दाखवतात. तात्पुरते अंतर्गत रस्ते करून बेकायदा प्लॉट विक्री करतात.
प्रशासनाचे दुर्लक्ष
प्लॉट विक्री करणारे जे काही सराईत आहेत, यामध्ये काही राजकीय नेते, कार्यकर्ते, गुन्हेगारही आहेत. चाकण परिसरात भागीदारी तत्त्वावर प्लॉट विक्रीचा व्यवसाय करतात काही इंडस्ट्रिअल झोनमध्ये प्लॉट आहेत. तेथेही प्लॉट विक्री करतात. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात राजकीय दबाव, तसेच काही लोक व्यक्तिगत दबाव आणून संबंधित अधिकाऱ्यांना ठरलेली आर्थिक चिरीमिरी देऊन जमीन विक्रीचे व्यवहार करतात. त्यांचे गुंठ्याला रेटही ठरलेले असतात. बेकायदा नोंदी मंडलाधिकारी, तलाठी यांच्याकडून करून घेतात. त्यामुळे या व्यवसायाला ऊत आला आहे.
नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांना, कामगारांना आवाहन करण्यात येते आहे की, नगरपरिषदेची कोणतीही परवानगी न घेता कोणीही अनधिकृत विनापरवाना प्लॉटिंग करत आहेत. ज्यांनी प्लॉटिंग विक्री सुरू केलेली आहे, अशा जागेची खरेदी कोणीही करू नये. अशी खरेदी केल्यास भविष्यात नगरपरिषदेकडून या जागेवर बांधकाम परवाना व सोयी सुविधा दिल्या जाणार नाहीत. तसेच येथे अनधिकृत बांधकाम केल्यास हे बांधकाम अनधिकृत बांधकाम म्हणून नगरपरिषदेच्या वतीने पाडण्यात येईल व त्यास विकत घेणारे जबाबदार राहतील.
- डॉ .अंकुश जाधव, मुख्याधिकारी, नगरपरिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

