चाकण परिसरात परप्रांतीय चोरटे
हरिदास कड : सकाळ वृत्तसेवा
चाकण, ता. ९ : येथील औद्योगिक वसाहतीमुळे रहिवासी वस्ती वाढलेली आहे. त्यामुळे बाहेरील राज्यातून तसेच बाहेरून जिल्ह्यातून आलेले तरुण चोरटे दुचाकीवर येऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचे प्रकार करतात. दोन ते तीन तोळे सोन्याचे दागिने अंदाजे ते हिसकावून नेतात. गेल्या सहा महिन्यांत पाच प्रकार झाले आहेत. त्यामधील चार घटनांतील चार चोरटे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून सुमारे चार लाखाचा माल जप्त करण्यात आलेला आहे.
चाकण (ता. खेड) येथे औद्योगिक वसाहतीमुळे रहिवासी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. रस्त्यावर महिलांची वर्दळ असते. गळ्यातील दागिने हिसकावणारे चोर हे साधारणपणे बाजारात गर्दीच्या ठिकाणी, तसेच मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर दुचाकीवरून येऊन महिलांच्या, ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील दागिने हाताने जोराचा हिसका देऊन ओढून नेतात. एक जण दुचाकी चालवत असतो व पाठीमागे बसलेला तरुण महिलांना हेरून त्यांच्या गळ्यातील दागिने ओढतो.
चोरीची पद्धत
दुचाकीवरून दोन तरुण येतात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ थांबतात. काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करून पादचारी महिलेजवळ येऊन थांबतात आणि दुचाकीवरील पाठीमागील तरुण जोरात हाताने हिसका देऊन दागिने ओढून नेतो.
साधारणपणे वर्षाला दहा घटना घडत असतात. या चोरांना पकडण्याचे कामही पोलिसांकडून होते. काही घटना उघडकीस येतात माल ही मिळतो. गर्दीच्या ठिकाणी जाताना महिलांनी दागिन्याची काळजी घेतली पाहिजे.
- संजय सोळंके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चाकण पोलिस ठाणे