भूसंपादन, मोजणीसाठी सहकार्य करा
चाकण, ता. १९ : चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे-नाशिक महामार्गाचे काम होणे महत्त्वाचे आहे. अपघातात अनेकांचे जीव जात आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी, सर्वांनी भूसंपादनासाठी आणि मोजणीसाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. असे उपजिल्हाधिकारी वनश्री लाभसेटवार यांनी सांगितले.
चाकण (ता. खेड) येथे पुणे-नाशिक महामार्गाच्या सुमारे नऊ हेक्टर ७४ आर जमीन संपादनासाठी बाधित शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला चिंबळी, कुरुळी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, चाकण, वाकीखुर्द येथील बाधित शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी शासनाने अगोदर जमिनीचे संपादन केले. परंतु मोबदला दिला नाही त्यामुळे आता संपादन करू नये तसेच रॅम्प (जोड रस्ता) साठी मोजणी करू नये असे सांगितले. शासनाचे अधिकारी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. यावेळी बाधित शेतकरी धीरज मुटके, सुरेश कांडगे, नवनाथ कड, शामराव देशमुख, नीलेश कड, प्रीतम परदेशी, दत्ता गवते, सागर परदेशी, अप्पासाहेब कड, हेमंत जैद, रूपेश जाधव, बाळासाहेब काळे, देवराम सोनवणे, स्वप्नील गोरे, फकिरा वळसे, कुणाल कड, संतोष बागडे, रमेश कांडगे, सचिन मांजरे, तेजस झोडगे, मंगेश आगरकर उपस्थित होते. यावेळी शेतकरी म्हणाले, ‘‘आमचा फुटबॉल होता कामा नये. रस्त्याच्या कामाला आमचा विरोध आहे.’’ खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे म्हणाले, ‘‘शेतकरी आणि अधिकारी यांच्यात समन्वय साधण्याची गरज आहे. या मार्गाचे काम तत्काळ होणे गरजेचे आहे. या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध करता कामा नये. रॅम्प जोड मार्गासाठी जमीन संपादित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला जाणार आहे. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत.’’
यावेळी पीएमआरडीएचे तहसीलदार अभिजित जगताप, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक नितीन सूर्यवंशी, एनएचआयचे अधिकारी, पुणे नाशिक महामार्ग कामाचे समन्वयक दिलीप मेदगे, पीएमआरडीएचे अधिकारी सुरेश कानडे, इतर अधिकारी तसेच विविध गावचे तलाठी मंडलाधिकारी उपस्थित होते.
एकाच मार्गाचे चौथ्यांदा संपादन
पुणे-नाशिक महामार्गाचे भूसंपादन यापूर्वी १९६६,२००६,२०१७ ला करण्यात आले आहे. बऱ्याचशा लोकांनी पैसे घेतलेले आहेत. त्यामुळे पुन्हा संपादन करता येणार नाही. हे नव्याने चौथ्या टप्प्यातील संपादन आहे. या मार्गावर एलिवेटेड कॉरिडॉर मार्ग होणार आहे. त्यासाठी रॅम्प जोडमार्गासाठी नव्याने संपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी जमिनीची मोजणी करण्यात येणार आहे.
बाधित शेतकऱ्यांची मागणी
- पुणे-नाशिक महामार्गावर वाकी खुर्द येथे काळोबा मंदिरसमाधी काढून देणार नाही. संपूर्ण क्षेत्राची मोजणी करा. जमीन संपादन करताना शेतकऱ्यांसाठी एक खिडकी योजना पाहिजे.
- पुणे-नाशिक महामार्गाच्या कामासाठी तीन वेळा यापूर्वी जमीन संपादन झाली आहे. चौथ्यांदा जमीन संपादन होत आहे. काही शेतकऱ्यांनी बनावट संपादित गट दाखवून भूसंपादनाचा मोबदला लाटला आहे हे सत्य आहे. ज्यांची खरोखरीच जमीन भूसंपादनात जात आहे त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहिजे. काही शेतकरी, कार्यकर्ते अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात. खोटी कागदपत्रे, चुकीचे मोजणीचे दस्तऐवज सादर करतात आणि मोबदला लाटतात याची चौकशी झाली पाहिजे.
पीएमआरडीएचे संपादन मंडळ पुणे-नाशिक महामार्गावरील ९ हेक्टर ७४ आर जमीन संपादन करणार आहे. यासाठी शेतकऱ्यांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.
अभिजित जगताप, तहसीलदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.