पवार करणार चाकणच्या कोंडीची पाहणी
चाकण, ता. ६ : पुणे- नाशिक महामार्ग, चाकण तळेगाव, चाकण शिक्रापूर महामार्ग तसेच औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडीची शुक्रवारी (ता.८) सकाळी सहा ते दहा या वेळेत उपमुख्यमंत्री अजित पवार पाहणी करणार आहेत, अशी माहिती खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी दिली.
चाकण (ता. खेड) येथील औद्योगिक वसाहत तसेच मुख्यमार्ग पुणे नाशिक महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. याबाबत नागरिक, कामगार, उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण यांचा मोठ्या प्रमाणात रोष आहे. ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समिती तसेच नागरिक, व्यावसायिक, डॉक्टर, उद्योजक, विद्यार्थी, कार्यकर्ते यांनी वाहतूक कोंडीच्या विरोधात निषेध करून आंदोलन केले होते.
दरम्यान, वाहतूक कोंडी सुरळीत व्हावी तसेच नवीन मार्ग व्हावेत अशी नागरिक, शेतकरी, कामगार, उद्योजक, व्यावसायिक, डॉक्टर यांची मागणी आहे. शासन या मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत. औद्योगिक वसाहतीमुळे अवजड वाहनांची संख्या वाढलेली आहे. दररोज सुमारे एक लाखावर अवजड वाहने तसेच इतर वाहने ये-जा करतात. दररोज कामगारांचे अपघात होतात. त्यात निष्पाप कामगारांचे जीव जात आहेत.
संबंधित विभागांना देणार निर्देश
उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी सकाळी सहा ते दहा या वेळेत वाहतूक कोंडीची पाहणी करणार आहेत. ते तळेगाव मार्गाने येऊन औद्योगिक वसाहत तसेच तळेगाव चौक, पुणे नाशिक महामार्ग, आंबेठाण चौक, चाकण शिक्रापूर मार्ग या विविध ठिकाणी पाहणी करणार आहेत. जी वाहतूक कोंडीची ठिकाणे आहेत त्या ठिकाणी पाहणी करणार आहेत व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देणार आहेत.
08997