चाकण परिसरात मृत्यूचे डोह
चाकण, ता.८ : भाम (ता. खेड) येथील भामा नदीतील डोह हे मृत्यूचे केंद्र बनले आहे. येथे कोणत्याही ऋतूंमध्ये पोहायला गेलेल्या बहुतांश जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. नदी पात्रात १० वर्षांत ५० पेक्षा अधिक बळी गेले आहेत.
गणेशोत्सवानिमित्ताने गणेशाचे विसर्जन करण्यासाठी वाकी खुर्द येथे भामा नदीत गेलेल्या दोघांचा मृत्यू झाला. शेलपिंपळगाव येथे भीमा नदीत एकाचा मृत्यू झाला. बिरदवडी येथे एकाचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या घडलेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मृत्यूचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे हे भयानक वास्तव आहे. खेड तालुक्यातील भामा, भीमा, इंद्रायणी या नद्यांमध्ये पोहण्यासाठी जाणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. गणेशोत्सवात गणेश विसर्जनही या प्रमुख नद्यांमध्ये केले जाते. भामला उन्हाळ्यात, हिवाळ्यात पोहायला येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. भाम, वाकी खुर्द येथे गणेशोत्सवात अनेक जण गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नदीच्या पाण्यात उतरतात तोल जाऊन घसरतात. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जातात आणि बुडतात त्यानंतर मृत्युमुखी पडतात. या दुर्घटना रोखण्यासाठी जीवरक्षकासह योग्य उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
चाकणजवळील पुणे- नाशिक महामार्गावरील भाम, संतोषनगर येथील भामा नदीच्या डोहात अनेक तरुण, मुली, ज्येष्ठ तसेच विवाहित जोडप्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. बुडण्याचे प्रमाण रोखण्यासाठी पोहणारे तसेच शासनाने दक्षता घेणे गरजेचे आहे. कडाचीवाडी येथील पाझर तलावात आतापर्यंत अनेक तरुण, शाळकरी विद्यार्थी, दोन सख्खी भावंडे, कामगार पोहताना बुडालेले आहेत. तीन महिन्यांपूर्वी कडाचीवाडी येथील पाझर तलावात शाळकरी चार लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. भामा आसखेड, चासकमान धरणात बुडून अनेकांचे जीव गेले आहेत. भीमा, भामा,इंद्रायणी नदीतही अनेकांचे बुडून जीव जात आहेत. नदीतील डोहात तसेच पात्रात जलपर्णी, शेवाळे साचले आहेत. येथे पोहताना पाय किंवा हात खडकात पूर्णपणे अडकला जातो. काही पाण्याचे गतिमान भवरे आहेत त्यात गेल्यानंतर पाण्यात ओढले जाऊन बुडून मृत्यू होतो. पोहायला गेल्यानंतर बरोबर अनुभवी, पोहण्यात तरबेज असलेली व्यक्तीबरोबर असणे आवश्यक झाले आहे.
भामा नदीवर चाकण नगरपरिषदेच्या वतीने गणेश मूर्तीचे संकलन केंद्र तसेच कृत्रिम तलाव बनविला होता . तेथे नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी ठाण मांडून होते. त्यामुळे गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी कोणी भामा नदीत जाणार नाही याची दक्षता घेतली जात होती.
-डॉ. अंकुश जाधव, मुख्याधिकारी, चाकण नगरपरिषद
भाम येथील भामा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाजवळील डोह पोहण्यासाठी खूप धोकादायक बनला आहे. येथे शक्यतो पोहण्यास येऊच नये. अनेकांचे जीव गेल्याने डोहात पोहताना खूप काळजी घ्यावी. पोहण्यासाठी हे धोकादायक ठिकाण बनले आहे. याबाबतचा फलक ग्रामपंचायतीच्या वतीने लावण्यात येईल. वरिष्ठांशी पत्रव्यवहार करणार आहोत.
- शरद कड, सरपंच, भाम (ता. खेड)
पोहताना अशी घ्या काळजी
पाण्याचा प्रवाहाचा वेग पाहा
पाण्याची खोली, गाळ किती?
खडक, मोठ्या दगडांचा अंदाज घ्या
पाण्यात भोवऱ्यांचा अंदाज घ्या
साप, धामण आदींची डोहातील ठिकाणे कोणती आहेत ती स्थानिकांकडून माहिती करून घ्यावी
‘लाइफ जॅकेट’चा वापर आवश्यक
नदीच्या डोहातील पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण टाळण्यासाठी लहान मुलांवर पालकांनी लक्ष ठेवले पाहिजे. पोहणाऱ्याच्या
सुरक्षिततेसाठी ‘लाइफ जॅकेट’ वापरणे गरजेचे बनले आहे. पोहताना दम लागला तर पाण्यावर तरंगण्यासाठी सहायक ठरेल, अशी साधने वापरावीत. यामध्ये हवेची ट्यूब, प्लॅस्टिकचे मोकळे डबे, पारंपरिक पांगाऱ्याच्या लाकडाचे पेटे आदींचा समावेश असावा.
हे शक्यतो टाळा
पाण्याच्या अधिक खोलीत पोहणे टाळा
विहिरीत उंचीवरून उड्या मारणे टाळा
पोहण्यास उतरताना मद्यपान करणे टाळा
नदीत जलपर्णी, शेवाळे आदी ठिकाणांपासून दूर रहा
सांडव्यावरून तसेच नदीच्या वेगवान प्रवाहात उडी मारू नका