चाकण एसटी बसस्थानकात गुंडांचा त्रास

चाकण एसटी बसस्थानकात गुंडांचा त्रास

Published on

चाकण, ता. ११ : पुणे-नाशिक महामार्ग तसेच चाकण शिक्रापूर मार्गाजवळील एसटी बस स्थानक आगाराचा परिसर, माणिक चौक परिसर बिहार झालाय का? असे चित्र निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिक, प्रवासी आणि कामगारांसाठी चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.
चाकण (ता. खेड) येथील एसटी बस स्थानक आवारात अनेक गुंडांचा त्रास दिवसरात्र होत आहे. बसस्थानक मद्यपींचा अड्डा झाला असून येथे जुगारही खेळला जातो. येथे मटक्याचा अड्डाही चालविला जातो. या बसस्थानकावर वादावादी, मारामारी होते. काही प्रकरणे पोलिस ठाण्यापर्यंत जातात तर काही प्रकरणे पोलिस ठाण्यापर्यंत जात नाहीत. बस स्थानकावर वाहतूक नियंत्रक असले तरी त्यांना मर्यादा आहेत. तेही काही प्रकरण झाले तर पोलिसांना फोन करतात, पोलिस येतात परंतु ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते. या परिसरात मोठ्या प्रमाणात पथारीवालेही बसतात त्यामुळे येथे दादागिरी, दहशत, जुगार अड्डा हे सर्व प्रकार चालू असतात. चाकण बस स्थानक परिसरात लोकांची ये-जा असते. या ठिकाणी काही लोकांना मारहाण करून त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रकार घडले आहेत.

प्रशासनाने पावले उचलावीत
चाकण बस स्थानक परिसरात तसेच जुना पुणे-नाशिक मार्ग माणिक चौकात पथारीवाले, हातगाडी वाले मोठ्या प्रमाणात बसतात ते पोलिसांनाही ऐकत नाहीत. पोलिसांना प्रतिशब्द केल्याने त्यांच्यामध्ये वादावादी होते. येथे फक्त दादागिरी, भाईगिरी चालते. त्यामुळे पथारीवाले हातगाडीवाले सर्रास येथे दिसतात. नगरपरिषद नाणेकरवाडी ग्रामपंचायत यांचे कोणीही ऐकत नाही. त्यामुळे येथे मोठा बाजार असतो. पथारी वाले हातगाडीवाले येथे कचरा रस्त्यावरच टाकतात तोही कचरा वेळेवर उचलला जात नाही. त्यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरते. त्यामुळे येथे प्रशासन आहे की नाही असेही चित्र निर्माण होत आहे. चाकण बस स्थानक परिसर माणिक चौक परिसरात सातत्याने वादावादी, मारामारीचे प्रकार सुरू असतात. यावर पोलिसांचे नियंत्रण नाही नगरपरिषद नाणेकरवाडी ग्रामपंचायत ‘जैसे थे’ आहे त्यामुळे या परिसराचा बिहार झालाय का असे अनेकांचे म्हणणे आहे. याबाबतीत प्रशासनाने पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पथारीवाल्याचीच दादागिरी
पोलिस ठाण्यातील एक हवालदार एका पथारीवाल्याला रस्त्यावर बसू नका, वाहतुकीला अडथळा होतो असे सांगत होता. परंतु त्या पथारीवाल्याचीच दादागिरी त्या पोलिस हवालदाराला सहन करावी लागत होती. अखेर त्या पोलिस हवालदाराने पोलिस निरीक्षकांना सांगितले त्यानंतर त्याला कसेबसे बाजूला केले असे चित्र होते.

बसस्थानक परिसरात एका व्यक्तीला जबर मारहाण केली. त्याच्या डोक्यात दगड घातला त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संजय सोळंके, वरिष्ठ निरीक्षक, चाकण पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com