चाकणला मतदार यादीवर ४९१५ हरकती अर्ज
चाकण, ता. ३० : येथील चाकण नगरपरिषदेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक येत्या काही महिन्यात होत आहे. या निवडणुकीनिमित्ताने मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाला होता. काही मतदारांची दुबार नावे आहेत. त्यामुळे ४९१५ हरकती अर्ज आले आहेत.
त्याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समक्ष घरोघरी पाहणी करून मतदार ज्या प्रभागात राहतो त्याच्या मागणीनुसार त्या प्रभागात त्याचे मतदार यादीत नाव ठेवले आहे. मतदार यादीत ज्यांची दुबार नावे आहेत त्यांची नावे अर्ज दिल्यानंतर काढण्यात येणार आहेत. काही दुबार नावे काढलेली आहेत. मतदार यादीत ज्यांची दुबार नावे आलेली आहेत त्यांच्यापुढे दुबार अशी नोंद आहे. त्यामुळे मतदान करताना त्यांना एकाच प्रभागात मतदान करता येणार आहे. चाकण नगरपरिषदेची अंतिम मतदार यादी शुक्रवारी (ता. ३१) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नगरपरिषदेचे एकूण मतदार ३३,१७८ आहेत, अशी माहिती चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात चाकण नगरपरिषद ही औद्योगिक दृष्ट्या तसेच रहिवासी लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी समजली जाते ही ‘ब’ वर्गातील नगरपरिषद आहे. या नगरपरिषदेच्या मतदार यादीत सुमारे ३३ हजार प्रत्यक्ष मतदार असले तरी वास्तव लोकसंख्या अगदी दोन लाखांच्या पुढे आहे. चाकण शहरात नगरपरिषदेच्या हद्दीत राज्यातील, परराज्यातील तसेच, देशातील कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहण्यास आहे. निम्मा मतदार हा भाडेकरू व बाहेरील आहे.
नगरपरिषदेचे एकूण १२ प्रभाग
नगरपरिषदेच्या १२ प्रभागात २५ नगरसेवक आहेत. तसेच, लोकनियुक्त एक नगराध्यक्ष असणार आहे. अकरा प्रभागात प्रत्येकी दोन नगरसेवक आहेत, तर एक क्रमांकाच्या प्रभागात तीन नगरसेवक आहेत. नगराध्यक्षपद यावेळी सर्वसाधारण महिलेसाठी आहे. त्यामुळे जो तो प्रभागातील मतदार आपल्या बाजूने कसा राहील यासाठी प्रयत्न करत आहे. मतदार यादीवर ज्याचे त्याचे निरीक्षण आहे. त्यामुळे हरकती अर्ज मोठ्या प्रमाणात आले हे वास्तव आहे.

