राज्यातील तमाशा फडांवर आचारसंहितेचा बडगा

राज्यातील तमाशा फडांवर आचारसंहितेचा बडगा

Published on

चाकण, ता. १५ : जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक जाहीर होताच सांस्कृतिक, मनोरंजन क्षेत्रावर आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीचा परिणाम दिसून येत आहे. विशेषतः तमाशा, लोककला महोत्सव, संगीत मैफिली, इतर लोककला, जत्रा आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर याचा थेट परिणाम होऊन आर्थिक फटका बसणार आहे. आधीच अडचणीत असलेल्या पारंपरिक तमाशाच्या कार्यक्रमांना यामुळे मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे सुप्रसिद्ध तमाशा कलावंत, अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी सांगितले.
आचारसंहितेत तमाशा कार्यक्रमासाठी विशिष्ट वेळ दिली जाते परंतु त्यामध्ये कार्यक्रम सादर करणे अवघड होते. काही ठिकाणी राजकीय रंग लागण्याच्या भीतीने प्रशासन कार्यक्रमांना परवानगी देण्यास टाळाटाळ करते. यामुळे केलेली तयारी, कलाकारांना दिलेली आगाऊ रक्कम, भाडे व इतर खर्च वाया जातात. या आर्थिक तोट्यामुळे तमाशा फड मालक कर्जबाजारी होतात व कलाकारांची आर्थिक अवस्थाही बिकट होते.
आचारसंहितेत राजकीय प्रचाराशी संबंधित कार्यक्रमांवर निर्बंध असणे योग्य असले तरी गैरराजकीय सांस्कृतिक कार्यक्रम, तमाशा व इतर लोककला या कार्यक्रमांना बंदी असणे चुकीचे आहे, असे तमाशा फड मालक, कलाकारांचे म्हणणे आहे. तमाशा, इतर लोककला जपण्यासाठी शासनाने प्रोत्साहन द्यायला हवे. मात्र, निवडणुकीच्या काळात कलाकारांना कोणतीही आर्थिक मदत किंवा सवलत मिळत नाही. त्यामुळे अनेक पारंपरिक कला नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी
या परिस्थितीत पर्याय म्हणून प्रशासनाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणे आवश्यक आहे. गैरराजकीय, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ठराविक अटींवर परवानगी देता येऊ शकते. तसेच आचारसंहिता कालावधीत बाधित कलाकारांसाठी विशेष आर्थिक सहाय्य योजना, अनुदान उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. कार्यक्रम रद्द झाल्यास नुकसानभरपाईची व्यवस्था किंवा करसवलतींचाही विचार शासनाने करण्याची गरज आहे.

आचारसंहितेमुळे तमाशा कार्यक्रमांना परवानगी मिळत नाही. फड मालकांचे, कलावंतांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे. आचारसंहिता राबवत असताना निवडणुका व तमाशा, लोककला दोन्ही एकत्र नांदू शकतील असे धोरण असावे.
- रघुवीर खेडकर, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी तमाशा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com