चाकण परिसरात बालगुन्ह्यांचे प्रमाण वाढले

चाकण परिसरात बालगुन्ह्यांचे प्रमाण वाढले

Published on

चाकण, ता. २१ : खेड तालुक्यातील चाकण, महाळुंगे परिसरात गेल्या काही वर्षांपासून अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अगदी खून,चोरी, मारहाण, कोयते, पिस्तूल बाळगणे, दुचाकी चोरी, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणे अशा प्रकारच्या अनेक घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा मोठा सहभाग आहे. यामुळे नागरिक, कामगार, व्यावसायिक यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चाकण (ता. खेड) येथील औद्योगिक वसाहतीत कामधंद्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात लोक आले आहेत. पालक कामानिमित्त दिवसभर बाहेर राहत असल्याने अनेक अल्पवयीन मुले दुर्लक्षित राहतात. मोबाइल, सोशल मीडिया, हिंसक व्हिडिओ गेम्स, चुकीची संगत यामुळे ही मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. चाकण, महाळुंगे पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या पाच वर्षांत झालेल्या १० खुनांच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा मोठा सहभाग आहे. कोयत्याचा वापर करून अल्पवयीन मुलांनी दहशत निर्माण केल्याचे प्रकारही घडत आहेत. अल्पवयीन मुलांच्या टोळ्या निर्माण झालेल्या आहेत, त्यांचे ‘गॉडफादर’ही आहेत. कायद्याने अल्पवयीन असल्यामुळे त्यांना अटक करता येत नाही तसेच शिक्षाही मर्यादित असते याची जाणीव असल्याने काही गुन्हेगारी टोळ्या, सराईत गुन्हेगार, जामिनावर सुटलेले गुन्हेगार, गुंड अल्पवयीन मुलांचा वापर करून त्यांच्याकडून अगदी खुनाचे गुन्हे करवून घेत आहेत.

नशेत असताना कृत्य घडले...
अल्पवयीन मुले गांजा तसेच मद्याच्या नशेच्या आहारी पडत आहेत त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे व ते नशेत असताना अनेक गुन्हे करतात. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांना आम्ही नशेत होतो त्यामुळे हे घडले अशीही कबुली देतात. काही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी तसेच पालकांनी अनेक वेळा समज देऊनही, बालसुधारगृहातून आल्यानंतरही ते वारंवार तेच गुन्हे करतात त्यामुळे गुन्ह्याचे चक्र तसेच फिरत राहते. गुन्ह्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करून त्यांना पैसे देणे त्यांना नशेची साधने देणे असे काही सराईत गुन्हेगार करतात. त्यांना पार्ट्या देणे त्यातून अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असल्याचे भयानक चित्र समोर येत आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणाले की...
अल्पवयीन मुले व त्यांच्या पालकांसोबत समुपदेशन, शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम,बालसुधार गृहांच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन देण्यावर भर दिला जात आहे. काही अल्पवयीन मुलांना समुपदेशनासाठी बाल न्याय मंडळाकडेही पाठवण्यात येत आहे. केवळ कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही. मुलांना योग्य दिशा, खेळ, शिक्षण , संवाद मिळाल्यास त्यांना गुन्हेगारीपासून दूर ठेवणे शक्य आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com