चाकण, तळेगावची वाहतूक कोंडी सुटणार
चाकण, ता. १३ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) चाकण, तळेगाव औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्ते व मुख्य चाकण- तळेगाव, पुणे- नाशिक या मुख्य मार्गाला जोडणारे रस्ते या रस्त्यांच्या कामासाठी काँक्रीटीकरण व डांबरीकरण यासाठी सुमारे ४३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. काही कामांच्या निविदा निघालेल्या आहेत. काही कामांचे आदेशही निघालेले आहेत. काही कामे सुरू झालेली आहेत, अशी माहिती एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
चाकण, तळेगाव औद्योगिक वसाहतीत लाखो वाहने अवजड वाहने ये- जा करतात. मोठ्या रहदारीमुळे पावसाळ्यात रस्ते उखडले जातात. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. पावसाळ्यात औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्ते व मुख्य मार्गाला जोडणारे रस्ते पूर्णपणे खड्डेमय होतात. त्यातून वाहने चालवणे अवघड होते. त्या मार्गावर सातत्याने कामगारांचे अपघात होतात. त्यामुळे या मार्गांची कामे मार्गी लावावी, अशी मागणी अनेक वर्षापासून होती. यासाठी हे रस्ते उखडू नये व रस्त्यांची कामे योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी वाहतूक तज्ज्ञांच्या मदतीने आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील रस्ते, मुख्य चौक आदींची कामे करण्यात येणार आहेत. ही कामे साधारणपणे एक वर्षाच्या आत होण्याचा अंदाज आहे. काही कामांचा कालावधी अधिक आहे. यामध्ये औद्योगिक वसाहतीतील मुख्य मार्गांचे, अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण, दुरुस्ती तसेच पर्यायी रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.
चाकण, तळेगाव औद्योगिक वसाहतीत वर्दळीच्या ठिकाणी चार व सहापदरी रस्ते करण्यात येणार आहेत. अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गांची योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील वाहतुकीत सुधारणा होणार आहे. औद्योगिक वसाहतीत वाहतूक कोंडी होणार नाही. काही चौकात वाहतूक नियंत्रक दिवेही बसविण्यात येणार आहेत. पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचू नये यासाठी सांडपाणी वाहिन्यांची मोठी व्यवस्था केली जाणार आहे. चाकण औद्योगिक वसाहतीत साधारणपणे ११५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची कामे होणार आहेत.
याबाबत कामगार नेते जीवन येळवंडे यांनी सांगितले की, आम्ही वेळोवेळी चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत प्रश्न मांडला होता. ‘सकाळ’ने ही वेळोवेळी बातम्या दिल्या होत्या. रस्त्यावर कामगारांचे अपघात होत आहेत. अवजड वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीमुळे कामगार वेळेवर कंपनीत तसेच घरी जात नाहीत. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची कामे व्हावी, यासाठी वेळोवेळी मागणी केली होती.
चाकण- तळेगाव औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची कामे होणार आहेत. मुख्य मार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे होणार आहेत. शक्यतो पावसाळ्यापूर्वी ही कामे करण्यात येणार आहेत. काही रस्त्यांची कामे सुरू झालेली आहेत.
- नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

