चाकण-महाळुंगे पोलिस ठाणे विभाजनामुळे गैरसोय
चाकण, ता. १४ : चाकण, महाळुंगे पोलिस ठाण्याचे विभाजन करण्यात आले. त्यानंतर चाकण उत्तर, चाकण दक्षिण, महाळुंगे उत्तर, महाळुंगे दक्षिण अशी चार पोलिस ठाणी दोन पोलिस ठाण्यातून निर्माण करण्यात आली. तिथे वेगवेगळे मनुष्यबळ देण्यात आले अगदी ७०वर पोलिस अधिकारी, कर्मचारी एवढे एका पोलिस ठाण्यात मनुष्यबळ आहे. त्यामुळे मनुष्यबळ वाढले परंतु नागरिकांची गैरसोय ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
चाकणला पोलिस ठाण्याचे विभाजन झाले. परंतु, अगदी अर्धा किलोमीटरच्या आतमध्ये दोन्ही पोलिस ठाणी आहेत. जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावर दोन्ही पोलिस ठाणी असल्याने पोलिस ठाण्याचे विभाजन नक्की कशासाठी केले, कोणाच्या फायद्यासाठी केले असा नागरिकांचा सवाल आहे.
महाळुंगे उत्तर पोलिस ठाणे हे जुन्या पोलिस ठाण्यापासून साधारणपणे दोन किमी अंतरावर सावरदरी येथे आहे. त्यामुळे महाळुंगे, खराबवाडीतील नागरिकांना अगदी पोलिस ठाण्यात जाण्यासाठी लांब अंतर जावे लागत आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यांचे विभाजन योग्य नाही, ते योग्य प्रकारे केले पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे.
चाकण-महाळुंगे पोलिस ठाण्याच्या विभाजनाचा निर्णय अयोग्य आहे. त्याबाबत नागरिकांत, कामगार वर्गात नाराजी आहे. चाकण, महाळुंगे परिसरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार लक्षात घेऊन पोलिस ठाण्याचे विभाजन करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून पुढे आला. त्यानंतर त्याची अंमलबजावणी देखील झाली. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. परंतु, पोलिस ठाणी चालू करण्यात आली. सध्याच्या परिस्थितीत हे विभाजन योग्य नसून त्यामुळे नागरिकांची गैरसोय वाढत आहे. पोलीस ठाण्याचे विभाजन झाल्यामुळे गुन्ह्यांची नोंद, तक्रारींची चौकशी, कागदपत्रांसाठी नागरिकांना वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागत आहे. स्थानिक रहिवाशांच्या मते केवळ प्रशासकीय आदेशाने पोलिस ठाणी वेगळी करण्यात आली. परंतु हद्दी व्यवस्थित केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
याउलट काहींचे मत आहे की वाढत्या लोकसंख्येमुळे स्वतंत्र पोलीस ठाणे आवश्यक आहे. पण ती योग्य ठिकाणी केली पाहिजेत.
पोलिसांकडून कानावर हात
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मात्र कानावर हात ठेवलेले आहे. पोलिस आयुक्तांनी याबाबत निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
‘‘माझ्या घरासमोर पोलिस ठाणे आहे. फक्त पन्नास फुटावर परंतु मला तक्रार द्यायची असेल तर मला दोन किलोमीटर अंतराच्या पोलिस ठाण्यावर जावे लागते. कारण महाळुंगे गावचे विभाजन चाकण तळेगाव मार्गाने केलेले आहे, असे इतर गावांचे विभाजन ही झालेले आहे. त्यामुळे निम्मे गाव महाळुंगे दक्षिणमध्ये आहे तर निम्मे गाव महाळुंगे उत्तरमध्ये आहे. तसेच निम्मी गावे उत्तर चाकण पोलिस ठाण्यात आहे. तर निम्मे गाव दक्षिण पोलिस ठाण्यात आहे.’’
-चंद्रकांत इंगवले, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, महाळुंगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

