प्रशासन सुस्त, अतिक्रमणधारक मस्त
चाकण, ता.१८ : येथील (ता.खेड) पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर मार्गावरील दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. तळेगाव चौक, माणिक चौक येथे रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र, अतिक्रमणधारकांनी पुन्हा रस्ते अडविले. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
नित्य वाढणाऱ्या कोंडीचे कोणाला काही घेणे देणे नाही. या गंभीर समस्येबाबत प्रशासन सुस्त आहे. त्यासह नेतेही कोंडीकडे दुर्लक्ष करीत आहेत, याबाबत प्रवासी, नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
दृष्टिक्षेपात
- चाकण औद्योगिक वसाहतीतील अवजड वाहनांची संख्या अधिक
- पुणे-नाशिक महामार्गाचे काम होईना
- तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गाचे कामही प्रलंबित
- नाणेकरवाडी, तळेगाव तसेच माणिक चौकातील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष
- चाकण येथील नगरपरिषद प्रशासनाचा अतिक्रमणांकडे काणाडोळा
अशी आहे सद्यःस्थिती
- हातगाडीवाले, पथारीवाल्यांच्या अतिक्रमणात वाढ
- अतिक्रमणाच्या विळख्यात येथील रस्ते अरुंद
- अवजड वाहनांमुळे सातत्याने अपघात
- अवैध रिक्षा तसेच वाहतुकीमुळे चाकण चौकाचा श्वास कोंडला
- ध्वनी, वायू प्रदूषणामुळे नागरिक, कामगार हैराण
- रस्त्यावर विक्री करणाऱ्यांचे फावले
अद्याप विकास आराखडा मंजुरी विना
चाकणच्या रस्त्यावर बसणारे काहीजण म्हणतात की, आम्ही नगरपरिषदेची २० रुपयांची पावती फाडतो व बसतो. नगरपरिषद प्रशासन पथारीवाल्यांकडून २० रुपयांची पावती घेते. त्यामुळे अनेक जण रस्ता अडवून बसतात. त्यामुळे वाहतूक कोंडी काही सुधारत नाही. चाकण नगर परिषद अस्तित्वात येऊनही अजूनही विकास आराखड्याला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याची खंत चाकणकरांकडून व्यक्त होत आहे.
अतिक्रमण हटण्याकडे दुर्लक्ष
चाकण येथे प्रमुख मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. अतिक्रमण हटण्याकडे कोणाचेच लक्ष नाही त्यामुळे येथील अवस्था उत्तर प्रदेश, बिहार पेक्षाही अवघड आहे, असे अनेक सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, व्यावसायिक, तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सध्या शहरात स्वतंत्र भाजी मंडई नसल्यामुळे रस्त्यावरचा बाजार भरतो आहे. तळेगाव चौक, माणिक चौकात स्वच्छतागृह, सुलभ शौचालय नाही. पुढील काळात स्वच्छतागृह, सुलभ शौचालय बांधण्यात येतील.
-डॉ. अंकुश जाधव, मुख्याधिकारी, चाकण नगर परिषद
चाकण येथील पुणे नाशिक महामार्ग, तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच नवीन मार्गांची कामे करण्यासाठी सरकार पूर्णपणे उदासीन आहे. आचारसंहितेच्या बडग्यात कामे रखडली होती. परंतु ती कामे अजूनही सुरू झालेली नाही. त्यामुळे नागरिक, कामगारांसह सर्वांचे हाल होत आहेत. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली नाही तर ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- कुणाल कड, सदस्य ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

