महाळुंगे परिसरात वाहतूक कोंडी
चाकण, ता. २५ : येथील औद्योगिक वसाहतीत महाळुंगे, खालुंब्रे, खराबवाडी गावच्या हद्दीत चाकण- तळेगाव मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीला सारेच वैतागले आहेत. या वाहतूक कोंडीला जबाबदार नेमके कोण? हा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
चाकण (ता. खेड) औद्योगिक वसाहत परिसरातील महाळुंगे, खालुंब्रे ,खराबवाडी भागात मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. औद्योगिक वसाहतीतील कामगारांची ये- जा, मालवाहू ट्रक, कंटेनर, टँकर, ट्रेलर, बसेसची सततची वर्दळ, रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांग लागत आहे. विशेषतः महाळुंगे येथील मुख्य चौक औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वाराजवळ परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. महाळुंगे पोलिस ठाण्यासमोरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालक, कामगार, उद्योजकांना एक ते दोन तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते.
ही कोंडी सोडविण्यासाठी एमआयडीसी, तसेच संबंधित प्रशासनाकडून रस्ते रुंदीकरण, सिग्नल यंत्रणा सुधारणा, वाहतूक व्यवस्थापनासाठी स्वतंत्र योजना राबविणे महत्त्वाचे आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दीर्घकालीन नियोजनाची गरज आहे.
वाहतूक कोंडी का होते?
खालुंब्रे, महाळुंगे एचपी चौक ते पोलिस ठाणे, महाळुंगे कमान ते वाघजाईनगर फाटा, खराबवाडी, राणूबाई मळा या परिसरात चाकण- तळेगाव मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. चाकण औद्योगिक वसाहतीत महाळुंगे, खालुंब्रे, खराबवाडी या परिसरात मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने लावली जातात. मार्ग जरी महाळुंगे ते चाकण असा एकेरी वाहतुकीचा पोलिसांनी केला असला तरी वाहने बेशिस्तपणे लावली जातात. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते.
अतिक्रमणे कोणीच काढत नाही
चाकण- तळेगाव मार्गावर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. राडारोडा दगड टाकलेले आहेत. महाळुंगे, खराबवाडी, खालुंब्रे येथे हे वास्तव आहे. ही अतिक्रमणे कोणीच काढत नाही. त्यामुळे रस्ता अरुंद आहे. अवजड वाहने मोठ्या प्रमाणात ये- जा करत असल्याने वाहतूक कोंडी होते.
हा मार्ग एकेरी असला तरी यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक आहे. अवजड वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी केली जातात. कंपन्या माल उतरवण्यासाठी अवजड वाहनचालकांना टोकन देतात. ज्यांना टोकन मिळाले नाही ती वाहने रस्त्याच्या बाजूला उभी राहतात. अगोदरच रस्ता अरुंद आहे. तसेच, एकेरी मार्गावर अनेक वाहन चालक बेशिस्तपणे वाहन चालवतात. या मार्गाचे काम लवकर होणे गरजेचे आहे.
- नीलेश वाघमारे, पलिस निरीक्षक, महाळुंगे वाहतूक विभाग
10237
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

