चाकणला १८० कोटींची वसुली
चाकण, ता. ६ : चाकण औद्योगिक वसाहत तसेच निवासी विकासामुळे चाकण येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचा वेग वाढला आहे. गेल्या वर्षभरात तब्बल १८० कोटी रुपयांची महसूल वसुली झाली आहे. दस्तऐवजांची नोंदणी करण्यासाठी कार्यालयात मोठी गर्दी होत आहे.
चाकण परिसरातील औद्योगिक गुंतवणूक, नवीन गृहनिर्माण प्रकल्प, जमिनीचे खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये झालेली वाढ यामुळे ही मोठी वसुली झाल्याचे चाकण येथील दुय्यम निबंधक तेजदेव काटे यांनी ही माहिती दिली. दुय्यम निबंधक कार्यालयातील आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२३ ते ६ मार्च २०२४ पर्यंत १६५७२ दस्तांची नोंदणी करण्यात आली आहे. मुद्रांक शुल्क व नोंदणी फी मिळून १५८.२८ कोटी एकूण महसूल वसुली झाली आहे. प्रत्येक व्यवहारावर आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्कामुळे सरकारच्या तिजोरीत मोठा महसूल जमा होत आहे. सध्या ऑनलाइन, डिजिटल दस्त प्रक्रिया, ई-चलन यांसारख्या सुविधांमुळे नागरिकांना दस्त नोंदणी प्रक्रिया सोपी व जलद झाली आहे. चाकण व परिसरात औद्योगिक गुंतवणुकीबरोबरच स्थावर मालमत्ता (रिअल इस्टेट) क्षेत्रही वेगाने वाढत आहे. पुणे-नाशिक महामार्ग, तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्ग तसेच औद्योगिक वसाहतीमुळे येथील जमिनींची मागणी वाढली आहे. निवासी, औद्योगिक भूखंड विक्रीला ऊत आला आहे. त्यामुळे दस्त नोंदणी वाढली आहे व महसूल वसुलीमध्ये वाढ होत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तामुळे ही वसुली ३१ मार्चपर्यंत अधिक वाढणार आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन खरेदी विक्रीचे दस्तऐवज, रिसेल, तारण, गहाणखत, बँकेचे मुक्तिपत्र (रिलीज लेटर) विविध करारनामे, हक्कसोडपत्र वाटपपत्र व विविध दस्तऐवजांची नोंदणी केली जाते.
दृष्टिक्षेपात
एकूण दस्त :१६५७२
दर महिन्याला साधारणपणे १४००, १५००, १६०० दस्तांची नोंदणी होते.
आर्थिक वर्षातील आकडेवारी (रुपयांत)
एकूण मुद्रांक शुल्क : १४५ कोटी, ६४ लाख, ३९०३
एकूण नोंदणी शुल्क : १२६ कोटी ४३ लाख ६९८३
एकूण वसुली : १५८ कोटी २८ लाख ४० हजार ८८६
अपेक्षित लक्ष्य २३० कोटी रुपये असून, आतापर्यंत ६३.३२ टक्के पूर्ण झाले आहे. ३१ मार्चपर्यंत एकूण १८० कोटी रुपये वसुली होईल.
- तेजदेव काटे, दुय्यम निबंधक, चाकण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

