भाविकांचे श्रद्धा स्थान: शंभो महादेवाचे मंदिर* देवालय साठी मजकूर
स्वयंभू श्री शंभो महादेवाचे मंदिर
पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील गुंडाळवाडी, बुरसेवाडी, ठाकरवस्ती आणि आदिवासी वस्ती, असे मिळून बिबी हे गाव वसलेले आहे. याच परिसराच्या केंद्रस्थानी असलेल्या ८०० ते ९०० मीटर उंचीवरील एका गोलाकार पिंडीच्या आकाराच्या टेकडीवर स्वयंभू महादेवाचे सुप्रसिद्ध मंदिर मोठ्या दिमाखात उभे आहे.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून ४५ किलोमीटर तर राजगुरुनगर शहरापासून केवळ २३ किलोमीटर अंतरावर हे तिर्थक्षेत्र आहे. टेकडीवरील मंदिराकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्या असलेला रस्ता आहे. मंदिराकडे जाण्यासाठी हा मार्ग महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने विकसित केला आहे. महाराष्ट्र शासनाने हे तिर्थक्षेत्र ‘क’ वर्गातील तिर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. मंदिराच्या पूर्वेकडील रस्त्याने शंभर मीटर उतरल्यावरील रस्त्याला लागूनच पुरातन काळापासून अस्तित्वात असलेल्या पाण्याच्या दोन टाक्या आहेत. डोंगराच्या पायथ्याला चास-कमान धरणाचे पाणलोट क्षेत्राचा अत्यंत नयनरम्य परिसर पाहून मन हरखून जाते. या टेकडीच्या पश्चिमेकडील डोंगरावर सुप्रसिद्ध सह्याद्री स्कूल आणि उद्योगपती फिरोदिया यांनी स्थापन केलेले जैन समाजाचे नवलविरायतन हे आध्यात्मिक केंद्र आहे.
मंदिराबाबत सांगायचे झाल्यास मंदिर हे पेशवेकालीन कालखंडात प्रसिद्ध मराठा सरदार मल्हारराव होळकर यांचे पुढाकारातून निर्माण झाले आहे. होळकर यांच्या सूनबाई महाराणी अहिल्यादेवी यांनी महाराष्ट्रात अनेक मंदिरे बांधली, त्याच मालिकेतील हे स्वयंभू महादेवाचे मंदिर आहे. मंदिराचा गाभारा हा घडवलेल्या दगडी बांधकामाचा असून मंदिराचा कळस उंच असून कळसावर देवदेवतांच्या विविध मूर्ती बसवून कळस बांधलेला आहे. कळसाच्या शेवटी सुवर्ण कळस असून देवदेवतांच्या मूर्तींमुळे कळस आकर्षक वाटतो. मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे सिमेंटपेक्षा जास्त टिकावू चुना व वाळू यांच्या मिश्रणातून साकारलेले आहे.
मंदिरासमोरील सभामंडपाचे काम भव्य सागवानी खांब व वर सागवानी तुळयांमध्ये तर छत लाकडी फळ्यांचे आहे. खांब व तुळयांवर आकर्षक नक्षीकाम असून जमिनीवर संगमरवर अंथरलेला आहे. मंदिराच्या धर्मशाळेत स्वयंपाकाची भांडी आणि साहित्य हे मंदिरात वास्तव्यास असणारे शिवभक्त, साधू महाराज यांच्यासाठी ठेवले आहे. मंदिरात एकूण अकरा मूर्ती असून त्यापैकी चार स्वयंभू ज्योर्तिलिंग आहेत. ज्याचा प्राचीन कथेमध्ये उल्लेख आहे, तर मंदिराच्या बाहेर चार नंदी आहेत. मंदिराचे बांधकाम १८३० साली सुरू होऊन १८३६ साली पूर्ण झाले. मंदिराचा १८५२, १९२९, १९९९ व २००६ मध्ये जिर्णोद्धार झाला आहे. श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी या स्वयंभू शंभो महादेवाची यात्रा भरते. त्यावेळेस अभिषेक, धार्मिक विधी मोठ्या प्रमाणावर पार पडतात. यात्रेसाठी खेड, आंबेगाव, जुन्नर परिसरातील व पुणे-मुंबई, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. चैत्र मासात जंगी काठीकावड यात्रा भरविण्यात येते. या यात्रेत अनेक मानाच्या काठीकावडी वाजत गाजत येतात.
असे सापडले चार स्वयंभू लिंग
शंभु महादेव देवस्थानच्या स्थापनेबाबत या ठिकाणी घडलेल्या घटनांच्या काही आख्यायिका आहेत. पाण्याखाली गेलेल्या मूळ बिबी या ठिकाणी सरदार होळकर यांचा भव्य वाडा होता. होळकर सरदारांचा वाडा व घोड्यांसाठी बांधण्यात आलेली पागा याचे अवशेष बिबी गावात शेवटपर्यंत अस्तित्वात होते. होळकर अत्यंत धार्मिक आणि दानशूर स्वभावाचे होते. एके दिवशी ते आपल्या शिपायांसोबत फिरण्यासाठी गेले असताना, त्या ठिकाणी अचानक समोरून एक वराह (डुक्कर) पळत जाताना दिसले. या वराहाचा पाठलाग करून ते पकडण्याचे फर्मान शिपायांना दिले. शिपायांनी या वराहाचा पाठलाग केला. मात्र, ते अतिशय तेजस्वी व चपळ असल्याने त्यांच्या हाती ते लागले नाही. मात्र, पळता-पळता ते बिबी ग्रामच्या उत्तरेकडील डोंगरावर पळत जाऊन त्याने डोंगराचे शिखर गाठले. डोंगरमाथ्यावरील एका करवंदीच्या जाळीत हे वराह शिरल्यावर शिपायांनी करवंदीच्या जाळीला वेढा देवून वराहाचा शोध घेतला. परंतु, या ठिकाणी ते वराह अदृश्य झाले. झालेला प्रकार शिपायांनी सरदार होळकर यांना सांगितल्यावर होळकरांनी महापुरुषांना बोलावून घेत हा प्रकार सांगितला. महापुरुषांच्या आज्ञेप्रमाणे ज्या ठिकाणी वराह अदृश्य झाले. त्या ठिकाणी उत्खनन केले. तेथे तांब्याची चार शिवलिंगे सापडली. सरदार होळकर अचंबित होऊन, त्यांनी त्या ठिकाणी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला.
ही चारही स्वयंभू लिंगे आजही या शंभो महादेवाच्या मंदिरात स्थापित आहेत. आजही त्या वराहाचे स्मरण म्हणून स्वयंभू मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये वराहाचे प्रतीक असलेली वराहची मूर्ती महादेवाच्या शेजारी उभी आहे. शंभो महादेव हे होळकरांचे दैवत आहे.
स्वयंभू महादेव या ठिकाणी वैराग्य धारण करून विराजमान असल्याने या मंदिराच्या गाभाऱ्यात स्त्रिया प्रवेश करत नाहीत, असे मानले जाते.
शंभो महादेवाचीच किमया
अगदी अलीकडे आणखी एक घडलेली घटना म्हणजे चास-कमान धरणाचे काम हे १९७६ मध्ये सुरू झाले. त्यावेळी या गावातील जुनी जाणती मंडळी सांगतात की, भीमा नदीला शंभु महादेवाच्या पंचक्रोशीत कोणीही अडवू शकत नाही, भीमा नदी ही भीमाशंकरला उगम पावलेली असून शंभु महादेवाच्या मंदिराच्या बाजूने वाहते व पंढरपूरला चंद्रभागेचे रूप धारण करते. या ठिकाणी नदीचा प्रवाह कोणतीही शक्ती अडवू शकत नाही, अशी स्थानिक जनमानसात दृढ श्रद्धा आहे. १९७६ मध्ये जेव्हा धरणाचे काम सुरू झाले. त्यावेळी पाटबंधारे प्रशासन व इतर काही लोक ही बाब गांभीर्याने घेत नव्हते. धरणाचे बांधकाम १९७६ मध्ये सुरू होऊन १९९० मध्ये धरणाच्या भिंतीचे काम पूर्ण होऊन भीमा नदीचे पाणी अडविण्यात आले. पाणी अडवून धरण जरी पूर्ण झाले असले तरी पाटबंधारे विभागाला हे पाणी पूर्णपणे अडविण्यात यश आले नाही. कारण नदीचे मुळ पात्र ज्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात झिरपत होता, त्या ठिकाणी देशातील नामवंत तज्ञ तसेच जर्मनी सारख्या प्रगत राष्ट्रांतून विदेशी तंत्रज्ञ येऊन पाणबुडीच्या साह्याने हा झिरपणारा पाण्याचा प्रवाह शोधण्याचा आधुनिक तंत्राच्या साह्याने प्रयत्न केला. पण, त्या प्रवाहाला आजही मोठ-मोठे तंत्रज्ञ शोधू शकलेले नाहीत, हे सत्य आहे. आजही पावसाळ्यात धरणाचा जलाशय गढूळ पाण्याने भरलेला असतो. मात्र, ज्या ठिकाणी हा पाण्याचा उपळा आहे. त्या उपळ्याच्या ठिकाणी पाणी शुद्ध, स्वच्छ व पारदर्शी असते. शुद्ध पाण्याचा हा स्रोत अखंड सुरू आहे. ही शंभो महादेवाचीच किमया आहे, अशी पंचक्रोशीतील नागरिकांची भावना आहे.
स्वयंभू शंभो महादेवाचे हे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णवेळ उघडे असते.
(शब्दाकंन - राजेंद्र लोथे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.