खेडच्या पश्चिम पट्ट्यातील पिके जोमदार

खेडच्या पश्चिम पट्ट्यातील पिके जोमदार

Published on

चास, ता.२३ : दमदार पावसाने भाताचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील भातपिकासह खरीप हंगामातील अन्य पिके जोमदार आहेत. अधून मधून पडत असलेल्या सूर्यप्रकाशामुळे पिकांची वाढ जोमाने झाली आहे. शेतीच्या आंतरमशागतींना सुरुवात झाली असून भाताची बेणणी तसेच अन्य पिकांच्या खुरपणीला वेग आला आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात वाडा मंडल कार्यक्षेत्रात जवळपास ३१४० हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात भातलागवड केली गेली असून, सोयाबीन पिकाचे क्षेत्रही मोठे आहे. सरासरी १५०० ते २००० मिलिमीटर सरासरी पाऊस पडणाऱ्या तालुक्याच्या या पश्चिम पट्ट्यात चालू वर्षी वरुणराजाने वेळेआधीच कृपादृष्टी दाखवत दमदारपणे बरसल्याने शेतकऱ्यांना मॉन्सूनपूर्व मशागतींना वा भातरोपे तयार करण्यासाठी वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे भाताच्या लागवडींना उशीर झाला होता.
खेडच्या पश्चिम पट्ट्यात खरीप हंगामात भाताचे पीक हे मुख्य असल्याने भाताची लागवड तसेच सोयाबीनसह अन्य खरिपाच्या पेरण्या व लागवडी पूर्ण झाल्यावर ऐन पिकांच्या वाढीतच गेली काही दिवसांपासून पावसाने दमदारपणे हजेरी लावल्याने पिकांना संजिवनी मिळाली असून पिके बहरली आहेत. त्यातच अधून मधून स्वच्छ सूर्यप्रकाश पडत असल्याने पिकांच्या वाढीसाठी चांगले पोषक वातावरण आहे. पिके जोमदार असून पिकांच्या आंतरमशागतीला सुरुवात झाली असून प्रामुख्याने महिला वर्ग यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतांमध्ये कामे करताना दृष्टीस पडतो आहे.

सूर्यप्रकाशाचा सकारात्मक परिणाम
प्रगतशील भात उत्पादक शेतकरी बाळासाहेब गोपाळे, स्वप्नील शिर्के, रामदास लांडगे, रामचंद्र वाळुंज म्हणाले की, भात लागवडीच्या सुरुवातीला भातखाचरात पाणी होते मात्र रोपेच तयार नसल्याने भात लागवडी उशिरा झाल्या. मात्र त्यानंतर भात लागवडी झाल्यावर पावसाने दमदारपणे आगमन केल्याने भाताच्या पिकासह अन्य पिके जोमदार आहेत. पिकांच्या वाढीच्या वेळेसच पावसासाह सूर्यप्रकाशाचा सकारात्मक परिणाम होत असल्याने पिकांवर सद्यःस्थितीत कीड व रोगाचा प्रादूर्भाव दिसत नाही.

03743

Marathi News Esakal
www.esakal.com