खेडमध्ये लपलाय निसर्गाच्या अद्भूत खजिना
राजेंद्र लोथे, चास
जगात पर्यटनाला दिवसेंदिवस महत्त्व प्राप्त होत असून अनेक देशांची अर्थव्यवस्थाच आज पर्यटनावर उभी आहे. पर्यटनाला प्राधान्य देत असल्याने आज अनेक देश परदेशी नागरिकांना पर्यटनासाठी आकर्षित करण्यात यशस्वी झाले आहेत. महाराष्ट्रातही उपलब्ध असणाऱ्या निसर्गसंपदेचा प्रचार आणि प्रसार करण्यात गेली काही महिने यश येत आहे. खेड तालुका धार्मिक पर्यटनाच्या बाबतीत अग्रेसर होत आहे. पर्यटनाला धार्मिकतेची जोड देण्याबरोबरच उपलब्ध नैसर्गिक साधनसंपन्नतेचा अधिकचा वापर करून प्रचार आणि प्रसार करण्यास प्राधान्य दिल्यास खेड तालुका पर्यटनाच्या दृष्टिने अग्रेसर होईल.
खेड तालुका आज सर्वत्रच पर्यटनाच्या दृष्टिने विविधतेने नटलेला आहे. या पट्ट्यातील पर्यटनाला निसर्ग पर्यटनाबरोबरच धार्मिकतेची जोड आहे. तालुक्याचे वैभव असलेले श्री भीमाशंकर देवस्थान हे बारा ज्योर्तिंलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग आहे. या शिवाय भीमा नदीचे उगमस्थान आहे. माउलींच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि ज्ञानेश्वर माउलींचे समाधीस्थळ असलेले तीर्थक्षेत्रे याच तालुक्यात आहे. कुमंडळा नदीचा उगम असलेली आणि निसर्ग संपन्नतेनी नटलेली श्री कुंडेश्वराची भूमी, दावडीचे महालक्ष्मी माता मंदिर आणि परिसर, खरपुडी येथील खंडोबाचे देवस्थान, निमगावचे श्री क्षेत्र खंडोबाचे देवस्थान, श्री क्षेत्र कडधे येथील खंडोबाचे देवस्थान, देवतोरणे येथील भैरवनाथाचे देवस्थान यासह गोवोगावी होणाऱ्या बैलगाडा शर्यती तसेच परदेशी पर्यटकांनाही वेड लावलेला रानभाज्या महोत्सव हे ह्या तालुक्याचे वैशिष्ट्य आहे. तालुक्याच्या प्रत्येक गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून पर्यटनाच्या दृष्टिने झपाट्याने पुढे येते आहे.
निसर्गाच्या सानिध्यात अध्यात्माची अनुभूती
गावागावाचा विचार केल्यास खेडच्या पश्चिम पट्ट्याच्या सुरवातीलाच पेशवेकालीन वैभव असलेले आणि थोरल्या बाजीराव पेशव्यांची सासुरवाडी असलेले चास गाव आणि या गावातील काशीबाईंचा वाडा, सोमेश्वराचे मंदिर, पाषाणी दगडी घाट व याच परिसरात निर्माण केलेला नयनरम्य बगीचा आणि त्यामधील रम्य कारंजे डोळ्यांचे पारणे फेडतात. ग्रामदैवत कुंडमाउलींच्या मंदिर परिसरात भीमा नदीपात्रात नैसर्गिकपणे तयार झालेले रांजणखळगे पर्यटकांसाठी वर्णी आहे. शिवाय दुर्मिळ असे लक्ष्मी-नारायणाचे सुवर्ण मंदिर आहेच. तालुक्याच्या पश्चिम टोकावर डोंगरामध्ये वसलेले भीमाशंकर पर्यटनाबरोबरच धार्मिकतेची जोड आहे. भोरगिरीवरून पायी मार्गस्थ होताना लागणारी घनदाट झाडी, आपल्या देशाचे वैभव असणारे शेकरू, ब्लू मॅार्मन फुलपाखरू यांचे दर्शन हमखास होतेच. याच मार्गात असलेले गुप्त भीमाशंकर, साक्षी विनायक, व भीमा नदीचे उगमस्थान पर्यटकांना आकर्षित करते.
पांडवकालीन लेणी, फेसाळणारे धबधबे
सह्याद्रीच्या विस्तीर्ण प्रमाणात पसरलेल्या डोंगररांगा व पावसाळ्यात या डोंगररांगेमधून कोसळणारे नयनरम्य धबधबे, भोरगिरीतील पुरातन कोटेश्वराचे मंदिर, तसेच नयनरम्य भोरगड आणि भोरगडावर असलेली पांडवकालीन लेणी, गुहा, फेसाळत कोसळणारे धबधबे ही पर्यटकांची आवडती ठिकाणे झाली आहेत.
येळवळी हे भीमाशंकरच्या कुशीत वसलेले आणि भोरगिरीपासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर डोंगरावर वसलेले गाव मुख्य रस्त्याला पक्क्या रस्त्याच्या माध्यमातून जोडले गेले आहे. येळवळी गावात पर्यटनासाठी आल्यावर गावापासून एक किलोमीटर डोंगरावरील सपाटीवरून पुढे गेल्यावर निसर्गाचा खरा आनंद म्हणजे कोकण कडा पहायला मिळतो, या कड्यावरून आपल्याला कलावंतीणीचा महाल, पेठचा किल्ला (कोथळ गड), तुंगीचा सुळका, माथेरानचे डोंगर, रिटर्न फॅाल आणि सगळ्यात नयनरम्य म्हणजे या कोकण कड्यावरून सूर्यास्त पाहणे म्हणजे येथे आल्याचे खऱ्या अर्थाने सार्थक होते.
रानभाज्यांचा महोत्सव
भीमाशंकराच्या पायथ्यांशी वसलेले पदरवाडी व तेथूनच जवळ असलेल्या ट्रेकिंग करणाऱ्या लोकांचे आवडते ठिकाण म्हणजे पदरगड हा निसर्गाचा अद्भूत ठेवा असून खेड तालुक्यातून भीमाशंकरच्या डोंगरावरून थेट पदरवाडीत पायी रस्त्याने तर रायगड जिल्ह्यातून कर्जत मार्गे शिडीचा घाट चढून या पदरवाडीत मार्गस्थ
होताना निसर्गाची मुक्तहस्ताने उधळण पहावयास मिळते. शिरूर-भीमाशंकर राज्यमार्गावर डोंगरावर वसलेल्या तीर्थक्षेत्राचा क दर्जा प्राप्त असलेले बिबी येथील श्री शंभू महादेवाचे देवस्थान नागरिकांना खुणावते. या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकरांनी केला आहे. हे ठिकाणही निसर्गाने नटलेले असून पर्यटकांसाठी पर्वणी आहे. गडद येथील दुर्गेश्वराचे दुर्गम आणि डोंगर भागातील मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी माघ पौर्णिमेपासून शिवलिंगावर आपोआप पाण्याचा अभिषेक सुरू होतो. हा अभिषेक एक महिना अव्याहतपणे राहतो. कुंडेश्वराचे हे निसर्गरम्य ठिकाण आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भोरगिरी, भोमाळे, वांद्रे परिसरात पावसाळ्यात होणारा रानभाज्या महोत्सव म्हणजे पर्वणी आहे. नवनवीन पर्यटकांपासून येथे दक्षिण कोरीयामधून आलेल्या चें. हिं. पार्क यांनीही या रानभाज्या महोत्सवाला हजेरी लावून रानभाज्यांचा आस्वाद घेतला होता.
तरुणाईला खुणावणारा निसर्ग
या पट्ट्याला खऱ्या अर्थाने वैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर भोरगिरी मार्गे भीमाशंकर हा मार्ग थेट वाहतुकीने जोडला गेल्यास पर्यटकांच्या नकाशावर तर हा पट्टा येईलच पण याला निसर्ग पर्यटनाबरोबरच धार्मिक पर्यटनाची जोड देण्याचे खरे कारण म्हणजे कित्येक वर्षांपासून ही ठिकाणे निसर्गाच्या अद्भूत खजिन्यात लपलेली आहेत. पण आज केवळ ज्या पर्यटकांना माहिती आहे तेच पर्यटक खेडच्या पश्चिम पट्ट्यातून मार्गस्थ होतात. त्यामध्ये जास्त गर्दी असते ती तरुणाईची. पावसाळ्यात कोसळणाऱ्या नयनरम्य धबधब्यांखाली भिजण्यासाठी येथे पर्यटकांची रीघ लागते. निसर्ग पर्यटनाबरोबरच धार्मिक पर्यटनाची जोड देण्याचे खरे कारण म्हणजे तालुक्यातील पर्यटनाचा हा सर्व भाग आदिवासी वस्त्यांचा आणि डोंगररांगांचा आहे. या भागात पर्यटक आल्यास आपोआपच आदिवासींना रोजगाराच्या विविध संधी तर उभ्या राहतीलच त्याचबरोबर भागाचा विकास झपाट्याने होण्यास मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

