केळी उत्पादकांच्या पदरी निराशा
चास, ता. ११ ः मिरजेवाडी (ता. खेड) येथील बाळासाहेब म्हातारबा घनवट या शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत केळीची लागवड केली होती. केळीचे पीक चांगले आले मात्र, बाजारभाव नसल्यामुळे पीक सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला दोन लाख रुपयांचा फटका बसला आहे.
केळी पिकाला भांडवली खर्च मोठा असला तरी या पिकाला बाजारभाव मिळाल्यास या पिकातून चांगले उत्पन्न मिळते. याचाच विचार करून घनवट यांनी सुमारे एक एकर क्षेत्रावर १२ जुलै २०२४ रोजी मशागत करून नांगरणी, फणणी, रोटरणी करून शेणखत टाकून २५ हजार ८०० केळीच्या रोपांची लागवड केली. पिकाला ठिबक सिंचन करून पाण्याचे व खतांचे नियोजन, तसेच योग्य मशागत केल्याने पीक जोमदार आले. हे सर्व करण्यासाठी जवळपास १ लाख ७५ हजार रुपयांचा खर्च आला. पीक काढणीला आल्यावर पहिल्या वेळेस ७९२ किलो माल निघाला. या मालाला प्रतिकिलो १३ रुपयांप्रमाणे बाजारभाव मिळाल्याने १० हजार २९६ रुपये मिळाले. शेतकऱ्याला बाजारभाव पाहून हुरूप आल्यावर पिकाला खते व पोषक द्रव्ये सुरूच होती. दुसऱ्या वेळेस १६ रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाला व त्यापासून १३ हजार ६९२ रुपये, तिसऱ्या वेळेस भाव उतरल्याने पुन्हा १३ रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाला व त्याचे ९६४६ रुपये मिळाले.
मात्र, त्यानंतर पिकाचे उत्पन्न वेगाने वाढू लागले व भाव उतरण्यास सुरुवात झाली. चौथ्या तोडणीला केळीचा १२५६ किलो माल मिळूनही ८ रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाल्याने १० हजार ४८ रुपये, तर पाचव्या वेळेला सहा, तर सातव्या वेळेस केवळ चार रुपये बाजारभाव मिळाल्याने केवळ ३९२८ रुपये शेतकऱ्याच्या पदरात आले. सद्यःस्थितीत बाजारात भाव नाही व उत्पादन खर्च व काढणीसाठी होत असलेली मजुरी पाहता शेतकऱ्याने केळीच्या बागेला पाणी देणे बंद केले असून, झाडाला लगडलेले केळीचे घड तसेच सोडून दिले आहेत.
पीक उत्तम आले होते, उत्पादनही चांगले येत होते. मात्र, केळीचे एकाच वेळी उत्पन्न सुरू न झाल्याने बाजारभाव मिळाला नाही. नंतर केवळ दोन ते तीन रुपये किलोला दर मिळत असल्याचे पाहून पिकाची काढणी, वाहतूक व मशागत पाहता खर्च परवडत नसल्याने पिकाची काढणी केली नाही. दोन लाखाच्या खर्चापासून केवळ ५० हजार रुपये मिळाले असून, वर्षभर शेत वाया गेले असून, जवळपास दोन लाख रुपयांचा फटका बसला आहे.
- बाळासाहेब घनवट, केळी उत्पादक शेतकरी
04222
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

