वडगाव कांदळीत बिबट्याच्या हल्ल्याचा थरार
खोडद, ता.२३ : मेंढ्यांच्या वाड्यात घुसून करडावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता बिबट्याने मुलगा आणि वडिलांवर हल्ला केला; मात्र याचवेळी वाड्यावर असलेल्या चार पाळीव कुत्र्यांनी बिबट्यावर झडप घातल्याने वडील व मुलगा बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले तर कुत्र्यांच्या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना वडगाव कांदळी येथे मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात बिबट्या ठार झाल्याची जुन्नर तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.
वडगाव कांदळी गावच्या हद्दीत (ता. जुन्नर) खोडद फाट्याजवळ भुजबळी येथे साळूराम धुळा कारगळ या मेंढपाळ व्यावसायिकाने आपल्या शेळ्या मेंढ्यांचा वाडा लावला होता. सर्व कुटुंबीयांसमवेत ते वाड्यावर थांबले होते. रात्री दीडच्या सुमारास बिबट्याने मेंढ्यांच्या वाड्यात प्रवेश केला आणि एक करडू पकडले.करडाचा ओरडण्याचा आवाज ऐकल्याने साळूराम करगळ यांचा मुलगा संतोष साळुराम करगळ (वय १५) हा करडाला वाचविण्यासाठी धावला, मात्र यावेळी बिबट्याने तोंडातील करडू सोडून दिले आणि संतोषवर झडप घातली या हल्ल्यात संतोषच्या डाव्या पायाला जखम झाली, यानंतर संतोषचे वडील साळुराम धुळा करगळ (वय ४०) हे संतोषला बिबट्याच्या तावडीतून सोडविण्यासाठी धावले. यावेळी बिबट्याने संतोषला सोडले आणि साळूराम करगळ यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याने त्यांच्या उजव्या मांडीला आणि डाव्या पोटरीला तसेच हाताला चावा घेतला आहे. यावेळी वडील-मुलाने मोठ्याने आरडाओरडा केल्याने वाड्यावर असलेल्या त्यांच्या चार पाळीव कुत्र्यांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली आणि बिबट्यावर झडप घातली. कुत्र्यांनी बिबट्यावर झडप घातल्यानंतर बिबट्याने साळूराम करगळ यांना सोडले. यावेळी कुत्र्यांच्या हल्ल्यातून बिबट्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याला पळून जाता आले नाही. या घटनेत करगळ यांच्या मदतीला कुत्रे धावून आले नसते तर संतोष किंवा साळूराम करगळ यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असता. कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला हा बिबट्या पाच वर्षांचा नर जातीचा आहे.
या घटनेची माहिती मिळताच वनपाल गणेश बागडे, वनरक्षक विशाल गुंड, रेस्क्यू टिमचे सदस्य सोमनाथ भालेराव, रवी काळे, रोशन भोर, संतोष कुतळ, शुभम भोर हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी झालेल्या वडील-मुलाला वनविभागाच्या वाहनातून नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सर्व मेंढपाळ बांधवांना वनविभागाने बिबट्या पासून संरक्षण होण्यासाठी सोलर लाइट, टेन्ट आदी साहित्य मोफत दिले आहे, तरी देखील मेंढपाळ बांधव टेन्ट आणि सोलर लाईटचा वापर करत नाहीत. टेन्ट दिलेले असतानाही अनेक मेंढपाळ बांधव वाड्यावर असताना उघड्यावरच झोपतात, यामुळे बिबट्याकडून हल्ला होण्याचा धोका अधिक आहे. मेंढपाळ बांधवांनी वाड्यावर असताना रात्री झोपण्यासाठी दिलेल्या टेन्टचा वापर करावा म्हणजे अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत.
- प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, जुन्नर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.