शिरोली बोरीत आयुर्वेदिक वनस्पतींचे वाटप
खोडद, ता. ३० : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बोरी (ता. जुन्नर) या शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक योगेश  शेळके यांनी त्यांची कन्या वृंदन हिचा वाढदिवस पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला. त्यांनी शाळेतील ६५ विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक वनस्पती मोफत दिल्या. 
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने योगेश शेळके व त्यांची पत्नी दीप्ती शेळके यांनी झाडांचे वितरण केले. यामध्ये शतावरी, कृष्ण तुळस, गवती चहा, कृष्ण कमळ, मधुमालती, गावरान व सुगंधी कढीपत्ता आदींचा समावेश आहे. 
याबाबत योगेश शेळके म्हणाले की, ‘‘विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष संवर्धनाची आवड निर्माण झाली पाहिजे. आधुनिकीकरणामुळे निसर्गातील समतोल हा बिघडत चालला असून त्याचे दुष्परिणाम आपल्याला वातावरणातील बदल तसेच ऋतुचक्रातील असंतुलन याद्वारे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची देशी झाडे यांची लागवड करून जोपासना करणे खूप गरजेचे आहे.’’ याप्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक प्रशांत गायकवाड, उषा भारती आदी उपस्थित होते.

