जुन्नर, आंबेगावमधील उत्पादकांवर ‘संक्रांत’
खोडद, ता.७ : निर्यातक्षम केळींचा बाजारभाव कोसळल्याने केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मोठ्या आशेने जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या क्षेत्रात केळीची लागवड केली आहे. मात्र चालू वर्षी केळीला समाधानकारक बाजारभाव न मिळाल्याने केळी फेकून देण्याची वेळ जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे.
या वर्षी तालुक्यात सुमारे ५०० एकर क्षेत्रातील केळीची छाटणी झाली. निर्यातक्षम केळींना आखाती देशांमध्ये मोठी मागणी असते. यामुळे या केळींना बाजारभावदेखील खात्रीशीर आणि चांगला मिळतो. म्हणून जुन्नर आंबेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी केळीची लागवड मोठ्या प्रमाणात केली, मात्र केळीला नीचांकी बाजारभाव मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे.
केळीला चांगला बाजारभाव असतो म्हणून जळगावमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत केळीच्या मोठ्या प्रमाणात लागवडी झाल्या. या परिसरात केळीच्या कंदाची लागवड होत असल्याने येथील शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी येतो. १५ जूनच्या आसपास स्थानिक बाजारपेठेत केळीचे भाव परत एकदा वाढायला सुरुवात होत असते. या वर्षी आखाती देशांमधून केळीला मागणी कमी झाल्याने आणि केळीचे बाजारभाव खाली आल्याने ज्या परिसरातून कमी दराने केळी मिळतील तेथील केळीची खरेदी निर्यातदार कंपन्यांनी सुरू केली. पर्यायाने पुणे जिल्ह्यातील केळीचे बाजारभाव आपोआपच खाली आले.
निर्यातदार कंपन्यांनी कमी दरात खरेदी
केळीला सलग तीन ते चार वर्षे बाजारभाव चांगला असल्याने सर्वत्र केळीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली.देशांतर्गत बाजारपेठेत केळीचे बाजारभाव सर्वत्र उतरले आहेत. या वर्षी स्थानिक बाजारपेठेत केळीला दोन ते तीन रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाला. स्थानिक बाजारपेठेत केळीची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने हा माल कुठे विकायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला, या संधीचा फायदा घेत निर्यातदार कंपन्यांनी हाच माल कमी दराने खरेदी करायला सुरुवात केली, याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांवर केळी फेकून देण्याची वेळ आली आहे.
दिवाळीपर्यंत निर्यातक्षम केळीला १८ ते २२ रुपयांपर्यंत प्रतिकिलो बाजारभाव होते. मात्र, दिवाळीनंतर इतर राज्यातीलदेखील केळी बाजारात एकाचवेळी आल्याने बाजारभावात मोठी घसरण झाली. हवामानातदेखील सातत्याने बदल होत आहेत, विपरीत वातावरणात केळी पिकवताना उत्पादन खर्च वाढत आहे.
- महेंद्र भोर, संचालक, बना हेल्थ प्रोड्यूसर कंपनी
दरवर्षी सरासरी एप्रिल, मेमध्ये केळीच्या बाजारभावात घसरण होते, मात्र या वर्षी नोव्हेंबरमध्ये बाजार घसरले आहेत .सध्या बाजारभाव सुधारायला सुरुवात झाली आहे.ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने निर्यात करण्यासाठी केळीची लागवड केली, त्यांना बाजार खाली आल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.
- मच्छिंद्र पोखरकर, केळी उत्पादक शेतकरी, खोडद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

