मानव- बिबट संघर्षात
आपली जबाबदारी मोलाची

मानव- बिबट संघर्षात आपली जबाबदारी मोलाची

Published on

मानव- बिबट संघर्षात
आपली जबाबदारी मोलाची

जुन्नर, बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे एक नवीन ओळख मिळालेला हा तालुका. या तालुक्यातील बिबट- मानव संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रात पोहचला. मानव- बिबट संघर्ष हा एकट्या जुन्नर पुरताच मर्यादित राहिला नाही तर अलीकडच्या काळात अवघ्या महाराष्ट्रभर हा संघर्ष पोहचला आहे. खरं तर या प्रश्नाकडे राज्य सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. बिबट्याच्या या समस्येबाबत वनविभागाला दोष न देता, किंवा वनविभागावर रोष व्यक्त न करता आता आपणच आपली स्वतःची काळजी स्वतः घेऊन बिबट्यापासून स्वतःचे संरक्षण करण्याची गरज आहे. जुन्नर वनविभागात बिबट प्रश्न ज्वलंत झाला आहे, यासाठी वनविभाग सातत्याने काम करत आहे.

- अशोक खरात, खोडद

जुन्नर वनविभागात सन २००० पासून बिबट्यांचा वावर सुरू झाला. एकेकाळी जंगलात राहणारा हा बिबट्या आता उसात राहू लागला. उसात राहणारी बिबट्याची ही चौथी पिढी आहे. त्यामुळे आता तो या अधिवासात पूर्णपणे स्थिरावला आहे. ऊस हा जरी बिबट्यांचा नैसर्गिक अधिवास नाही, मात्र उसातच जन्म झाल्यामुळे बिबट्याला ऊस हेच आपलं जंगल वाटू लागलं. शेतीमालाला खात्रीशीर बाजारभाव मिळत नसल्याने पर्यायाने हमखास उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून शेतकऱ्यांना उसाचे पीक घ्यावे लागते. शेती हाच इथला प्रमुख व्यवसाय असल्याने केवळ शेतीवरच इथले नागरिक आणि इथल्या बाजारपेठा अवलंबून आहेत.
मागील काही वर्षात म्हणजेच सन २००० ते २०२५ या २५ वर्षात जुन्नर वनविभागात आतापर्यंत बिबट्यांच्या ५६ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. सन २००० ते २०१८ या १८ वर्षांत (२३ जानेवारी २०१८ पर्यंत) बिबट्यांच्या हल्ल्यात २९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २०१८ ते २०२५ या अवघ्या ७ वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीच्या १८ वर्षांत झालेल्या मृत्यूपेक्षा शेवटच्या ७ वर्षांत झालेले मृत्यू हे आधीपेक्षा अधिक आहेत.
मानव- बिबट संघर्ष कमी करण्यासाठी वनविभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. विविध उपाययोजना, जनजागृती करून मानव बिबट संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, बिबट्यांच्या या समस्येपुढे वनविभाग देखील हतबल झालेले पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारच्या १९७२च्या वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे बिबट समस्या सोडविण्यासाठी कायदेशीर अडथळे येत आहेत. या कायद्यांतर्गत अनुसूची क्र.१मध्ये बिबट्याचा समावेश असल्याने बिबट्याला एकप्रकारे संरक्षण कवच प्राप्त झाले आहे.
बिबट्या हा मार्जर कुळातील प्राणी आहे. बिबट्याची एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे हा ॲडेप्टेबल (Adepteble) वातावरण व परिस्थितीनुरूप जुळवून घेणारा प्राणी आहे. अत्यंत लाजाळू, भित्रा आणि निशाचर असा हा बिबट्या. निशाचर असल्याने हा रात्री, पहाटे किंवा संध्याकाळी अंधार पडताना भक्ष्याच्या शोधत बाहेर पडतो, मात्र अलीकडच्या काळात बिबट्याने आपल्या स्वतःच्या सवयी देखील बदलल्या आहेत.
जुन्नरमधील बिबट्याने ज्याप्रमाणे येथील ऊस शेतीशी जुळवून घेतले आहे, तसेच येथील नागरिकांनी देखील बिबट्याच्या जीवनशैलीशी स्वतःला जुळवून घेतले आहे.जुन्नर हे असे एकमेव ठिकाण असेल जिथे अन्नसाखळीतील या घटकाला जुन्नर मधील नागरिकांनी आपल्यात सामावून घेतले आहे, मात्र अलीकडच्या काळात बिबट्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्याने मानव बिबट संघर्ष टोकाला गेला असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.
जुन्नर तालुक्यात १९९०च्या आधीपासूनच बिबट्यांचे अस्तित्व होते. मात्र, १९९०च्या दशकात चिल्हेवाडी, पिंपळगाव जोगे या धरणांची कामे सुरू झाली आणि त्यानंतर या परिसरातील बिबटे पूर्वेकडे स्थलांतरित झाले. पूर्वेकडे जंगले नाहीत पण ऊस शेती असल्याने ऊस शेतीत बिबट्याने आश्रय घेतला आणि तोच त्याचा अनैसर्गिक अधिवास झाला. २००१पासून पूर्वेकडील गावांमध्ये बिबट्यांचा उपद्रव चांगलाच वाढला. सन २००१ ते २००७ या काळात बिबट्यांकडून झालेल्या मानवी हल्ल्यांमुळे सुरुवातीचा काही काळ मानव- बिबट संघर्ष असा गेला, पण जुन्नरकरांनी बिबट्यांविरोधात कधीही आक्रमक भूमिका न घेता मोठ्या मनाने बिबट्यांचं अस्तित्व स्वीकारलं.
उसाच्या शेतात गारवा, सुरक्षित लपण, पाणी आणि सहज उपलब्ध होणारे भक्ष्य यामुळे ऊस पीक हे बिबट्यासाठी अत्यंत सुरक्षित
अधिवास झाला आहे. बिबट्याला काही भक्ष्य मिळाले नाही तर वेळप्रसंगी उंदीर, बेडूक खाऊन देखील बिबट्या आपले पोट भरतो. बिबट्याची मादी २ वर्षातून एकदा बछड्यांना जन्म देते. एका वेळी कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त चार बछड्यांना ती जन्म देते. अलीकडच्या काळात येथील पोषक वातावरणामुळे ती चार बछड्यांना जन्म देऊ लागली आहे.
आतापर्यंत बिबट्यांकडून जे मानवी हल्ले झाले आहेत, त्या मानवी हल्ल्यांच्या घटना म्हणजे शेतामध्ये खाली वाकून, तसेच खाली बसून काम करणाऱ्या शेतमजुरांवर, लहान मुलांवर किंवा नैसर्गिक विधीसाठी बसलेल्या व्यक्तींवर बिबट्यांचे हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांवरून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की बिबट्या त्याच्या नजरेच्या टप्प्यात म्हणजेच त्याच्या दृष्टिक्षेपात आलेल्या व्यक्तीला किंवा नागरिकाला प्राणी समजून त्यांच्यावर हल्ला करतो. बिबट्याला माणसावर हल्ला करायचा नसतो. केवळ त्याच्या नजरेच्या टप्प्याच्या खाली दिसत असलेल्या व्यक्तींवर प्राणी समजून बिबट्याने हल्ले केले आहेत.

वनविभागाने आतापर्यंत केलेली कामे
• जुन्नर तालुक्यातील संघर्ष क्षेत्रात पकडलेल्या १० बिबट्यांचे गुजरातमधील वनतारा प्राणी संग्रहालयात स्थलांतर केले.
• माणिकडोह बिबट निवारा केंद्र विस्तारीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या जागेसाठी जुन्नर वनविभागाने २ वर्षे अथक प्रयत्न व पाठपुरावा केला व राज्य सरकारकडून १२ हेक्टर नवीन जागा मिळविली.
• या बिबट निवारा केंद्राची बिबटे ठेवण्याची क्षमता ४४ वरून १५० होणार आहे.
• बिबट निवारा केंद्राचे हे काम वेगाने सुरू असून लवकरच पूर्णत्वास येईल.
• बिबट्यांची नसबंदी आणि बिबट्यांचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केले आहेत.
• बिबट्यांमुळे उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी ठिकठिकाणी बिबट बेस कॅम्प निर्माण केले आहेत. तसेच, ए.आय.चा वापर करण्यात येत आहे.
• मेंढपाळांना सुरक्षेसाठी मानेला लावण्यासाठी काटेरी पट्टा (नेक बेल्ट), सौर दिवे, आणि टेन्ट मोफत दिले आहेत.
• बिबट बेस कॅम्प, ए.आय. सिस्टिमचा वापर, घर- गोठ्याभोवती सौर ऊर्जा कुंपण या सारख्या सर्व नवीन उपाययोजना महाराष्ट्रात पहिल्यांदा जुन्नर वनविभागात सुरू केल्या.
• शेतकऱ्यांना घराभोवती लावण्यासाठी अनुदानावर सौर कुंपण दिले.
• शेतकऱ्यांच्या परिसरात लावण्यासाठी अनायडर दिले.
• बिबट्याची चाहूल लागण्यासाठी एआय आणि एज कम्प्युटिंग हे दुहेरी तंत्रज्ञान विकसित केले.

काय काळजी घ्याल
* कधीही बिबट्याचा पाठलाग करू नये, कारण तो घाबरून उलट हल्ला करू शकतो.
* आपले घर शेतात किंवा उसाच्या शेताजवळ असल्यास घराला कुंपण करावे.
* बिबट्या दिसल्यास त्याचे फोटो, शूटिंग काढण्याचा प्रयत्न करू नये, अशा वेळी तो हल्ला करू शकतो.
* लहान मुलांना खेळायला एकटे सोडू नये, शेताजवळ घर असल्यास लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे.
* शेतात जाताना, काम करताना परसाकडे जाताना आवाज करा. मोबाइलवर गाणी लावा.
* बिबट्या दिसल्यास जोरात आवाज करावा. खाली वाकू नये, ओणवे झोपू नये.
* रात्री घराबाहेर उघड्यावर झोपू नये.
* विद्यार्थ्यांनी शाळेत ये-जा करताना एकट्याने न करता समूहाने ये-जा करावी.
* सायंकाळी व रात्री अनावधानाने देखील एकट्याने बाहेर पडू नये. सोबतीने किंवा समुहाने वावरावे.
* लहान मुलांची व वयोवृद्ध नागरिकांची विशेष काळजी घ्यावी.
* ज्या ठिकाणी मोकाट कुत्रे, मेंढपाळांचे वाडे असतात, तिथे बिबट्या हमखास येतोच, हे लक्षात ठेवावे.
* कोणत्याही प्रकारे बिबट्याला जखमी करू नये. जखमी बिबट्या अधिक धोकादायक बनू शकतो.
* शेतात काम करताना अधिक काळजी घ्यावी.
* बिबट्या दिसल्यास तात्काळ जवळच्या वनविभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा.

Marathi News Esakal
www.esakal.com