निवडणुकांच्या धामधुमीत शिक्षकांची ‘केंद्रप्रमुख परीक्षा’
खोडद, ता. २५ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने केंद्र समन्वयक अथवा केंद्रप्रमुख या पदासाठी शिक्षकांची ३ फेब्रुवारी व ४ फेब्रुवारीला संपूर्ण राज्यभरात परीक्षा आयोजित केली आहे, मात्र ५ फेब्रुवारीला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे मतदान आहे. अनेक शिक्षकांची मतदान निवडणूक प्रक्रियेत नेमणूक करण्यात आल्याने अनेक शिक्षक या परीक्षेपासून वंचित राहणार असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सर्व शिक्षक संघटनांनी शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.
सध्या राज्यात बारा जिल्हा परिषदांच्या व पंचायत समितीच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. मतदान ५ फेब्रुवारीला होणार असल्याने शिक्षकांची निवडणूक कामावर नियुक्ती केली आहे. निवडणुकांच्या दोन दिवस आधी निवडणूक कर्मचारी असणाऱ्या शिक्षकांची प्रशिक्षणे आयोजित केलेली आहेत. निवडणूक कर्तव्यावर जाताना शिक्षकांना पूर्व तयारी करायची असते. तसेच अनेक शिक्षक बीएलओ, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून पूर्ण २ आठवडे या कामात गुंतलेले आहेत. मतदान स्लिप वाटण्याचे काम दोन दिवस आधी करायचे असते. त्यामुळे संपूर्ण आठवडा शिक्षक व्यस्त असताना अशातच परीक्षेचा घाट अनाकलनीय ठरत आहे.
२०२३पासून जाहीर झालेल्या या परीक्षेला २०२६ उजाडले पण आता ऐन निवडणुकीत अचानक मुहूर्त कसा सापडला हा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. परीक्षा परिषदेच्या या चुकीच्या निर्णयाने परीक्षेचे वाट पाहणारे अनेक शिक्षक या परीक्षेला मुकणार आहेत. तीन वर्षे न झालेली परीक्षा अजून २ महिने पुढे गेली तरी हरकत नाही असा शिक्षकांचा सूर आहे. मार्च-एप्रिलमध्ये जरी ही परीक्षा झाली तरी शिक्षकांची हरकत नाही. अशातच ८ फेब्रुवारी रोजी शिक्षकांची सीटीएटी ही केंद्राची परीक्षा होणार असल्याने एकाच आठवड्यात दोन परीक्षा देताना तसेच निवडणूक कामाला सामोरे जाताना मात्र शिक्षकांची दमछाक होणार आहे. निवडणूक कामे, परीक्षा, प्रवास यातून शिक्षकांना शारीरिक व मानसिक त्रास होणार असल्याने सदर परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये घेण्याची शिक्षक संघटनांची मागणी आहे. राज्यातून प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ, जुनी पेन्शन हक्क संघटना, केंद्रप्रमुख व पदवीधर संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, शिक्षक भरती यांसारख्या सर्व संघटनांनी शिक्षण मंत्री व परीक्षा परिषद आयुक्त यांना पत्रव्यवहार केला आहे.
परीक्षेला चुकीचा मुहूर्त सापडला आहे. ऐन निवडणूक काळात प्रशिक्षणे, बीएलओ किंवा मतदान अधिकारी म्हणून शिक्षक गुंतलेले असताना परीक्षेची तारीख महिनाभर पुढे ढकलण्याची आमची मागणी आहे. आयुक्त, शिक्षणमंत्री सकारात्मक निर्णय घेतील.
- सुभाष मोहरे, अध्यक्ष, पुणे जिल्हा अखिल शिक्षक संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

