समुपदेशातून मुलींना नवी दिशा

समुपदेशातून मुलींना नवी दिशा

Published on

जागतिक महिला दिनानिमित्त समाजात सकारात्मक बदल घडविणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची दखल घेतली जाते. पुणे जिल्ह्यातील समुपदेशक डॉ. अनुष्का प्रवीण शिंदे या ‘चला महत्त्वाचं बोलू थोडं..!’ या उपक्रमातून किशोरवयीन मुलींना मोफत समुपदेशन देत त्यांच्यात आत्मभान व वैचारिक जागृती निर्माण करत आहेत. आतापर्यंत सुमारे ७० हजार विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांनी ग्रामीण भागातील मुलींना योग्य दिशा देण्याचे काम केले आहे.


हिवरेतर्फे नारायणगाव (ता. जुन्नर) येथील शेतकरी कुटुंबातील डॉ. प्रवीण तुकाराम शिंदे व त्यांच्या पत्नी डॉ. अनुष्का प्रवीण शिंदे या डॉक्टर दांपत्याने मागील अनेक वर्षांपासून स्वतःला समाजसेवेत वाहून घेतले आहे. डॉ. प्रवीण शिंदे हे हिवरेतर्फे नारायणगाव येथे रुग्णांना सेवा देतात. येथील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून ते मागील १० वर्षांपासून काम करत आहेत. डॉ. अनुष्का शिंदे या नारायणगाव (ता. जुन्नर) येथे साईश्रद्धा होमिओपॅथीक क्लिनिकमध्ये मागील १५ वर्षांपासून सराव करत आहेत. मासिक पाळी, केसांचे आजार, त्वचेचे आजार व सौंदर्य विषयक समस्या, अशा विविध आजारांवर त्या उपचार करत आहेत. अनेक रुग्णांचे दुर्धर व जुने आजार त्यांनी होमिओपॅथीचे उपचार करून कायमस्वरूपी बरे केले आहेत.
सध्या ग्रामीण भागात प्रेम प्रकरणातून पळून जाऊन लग्न करण्याच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहेत. अपरिपक्वता, भिन्न शारीरिक आकर्षण, चित्रपटांचा प्रभाव, सोशल मीडियाचा अतिरेकी वापर आदी अन्य कारणांमुळे हा प्रकार वाढू लागला आहे. यामुळे त्या प्रकरणातील मुलगा आणि मुलगी या दोघांच्याही कुटुंबातील व्यक्तींना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. यातूनच पुढे काही अनुचित प्रकार देखील घडत असतात. या घटनांमुळे एकंदरीतच सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. या प्रकाराला थोडा फार का होईना आळा बसावा, याबाबत मुलींमध्ये आत्मभान निर्माण करून त्यांच्यात वैचारिक जागृती निर्माण करणे, त्यांना समुपदेशन करून या गोष्टींपासून परावृत्त करण्यासाठी डॉ. अनुष्का शिंदे यांनी १ जुलै २०१९ पासून ‘चला महत्त्वाचं बोलू थोडं..!’ हा उपक्रम सुरू केला आहे. त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम किशोरवयीन मुले, मुली, महिला व पालकांसाठी देखील दिशादर्शक, आश्वासक आणि सामाजिक स्वास्थ्य जपणारा ठरत आहे. अत्यंत व्यापक दृष्टिकोन जागृत ठेवत  डॉ. शिंदे  यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमादरम्यान डॉ. शिंदे या आपल्या कौशल्याने किशोरवयीन मुलींना मनमोकळेपणे संवाद साधायला भाग पाडतात.

मोफत जनजागृती
डॉ. अनुष्का शिंदे  यांनी आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील इयत्ता ८वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांनींशी  ‘चला महत्त्वाचं बोलू थोडं..!’ या उपक्रमाच्या माध्यमातून संवाद साधून त्यांना मोफत समुपदेशन करत आहेत. आयुष्याच्या जोडीदाराची निवड करताना, तारुण्याच्या उंबरठ्यावर येताना, कौटुंबिक जबाबदारी व महिला सबलीकरण, एड्स, कर्करोग, स्त्रीभ्रूण हत्या व आहार याविषयी देखील त्या मुला- मुलींमध्ये मोफत जनजागृती करत आहेत. महिलांसाठी महिलांचे आरोग्य व आहार, तर पालकांसाठी सुजान पालकत्व काळाची गरज, या विषयांवर देखील त्यांनी व्याख्याने दिली आहेत. प्रेरणादायी वक्ते म्हणून देखील डॉ. अनुष्का शिंदे काम करत आहेत.

७० हजार विद्यार्थिनींशी संवाद
आकाशवाणी पुणे केंद्राच्या ‘आरोग्यम् धनसंपदा’ या कार्यक्रमांतर्गत त्यांनी श्रोत्यांना अनेकदा आरोग्याविषयी माहिती दिली आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर आणि दौंड तालुक्यात देखील त्यांनी या उपक्रमांतर्गत ७० हजार विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांना समुपदेशन केले आहे. हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा त्यांचा मानस आहे.

डॉ. अनुष्का प्रवीण शिंदे
मो. ९९२२४२७२८२
डॉ. प्रवीण तुकाराम शिंदे
मो. ९९२२४०१९४३

01979, 01980, 01981

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com