नेहरमळा शाळेत व्यवहार ज्ञानाचे धडे
खोडद, ता. १ : पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथील नेहरमळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच मुलांना व्यवहार ज्ञानाचे धडे मिळण्यासाठी भरवलेला आनंदी बाजार उत्साहात पार पडल्याची माहिती मुख्याध्यापिका जयश्री जावळे यांनी दिली.
आनंदी बाजाराचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य ज्योती उदागे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुप्रिया झिंजाड यांच्या हस्ते झाले. त्यानंतर खाऊच्या विविध स्टॉलचे उद्घाटन पवन चव्हाण, विक्रम चव्हाण यांच्या हस्ते झाले.
यावेळी सरपंच रेश्मा बोटकर, उपसरपंच रामचंद्र डुकरे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष नितीन चव्हाण, माजी अध्यक्ष बळिराम चव्हाण, पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष सुभाष झिंजाड, नंदाताई चव्हाण, सविता चव्हाण, प्रियांका उदागे, ग्रामस्थ व सर्व पालक उपस्थित होते. या आनंदी बाजारात शेतात पिकवलेला भाजीपाला, कडधान्ये, फळे व स्वतः घरी बनवलेले खाद्यपदार्थ इत्यादींचे आकर्षक स्टॉल उभारले होते. बाजारात सुमारे पाच हजार रुपयांची उलाढाल झाली. या उपक्रमासाठी शिक्षिका संगीता कुदळे, अंगणवाडी सेविका रेखा कांबळे, छाया बेल्हेकर यांचे सहकार्य लाभले.

