
मद्यपानप्रकरणी पोलिसाविरुद्ध गुन्हा
दौंड, ता. १९ : दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलातील एका पोलिस नाईकविरुद्ध कर्तव्यावर असताना मद्यपान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड पोलिसांनी रविवारी (ता. १९) याबाबत माहिती दिली. राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातमध्ये विश्रामगृहासाठी गार्ड म्हणून नियुक्त पोलिस नाईक किर्तीशील श्रीकिसन कांबळे (रा. देवकीनगर, दौंड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (ता. १८) सायंकाळी कांबळे हा मद्यपान करून कर्तव्यावर हजर झाला आणि मद्यधुंद अवस्थेत त्याने गोंधळ घातला. राज्य राखीव पोलिस दलाचे उपनिरीक्षक भाऊसाहेब जाधव यांनी वरिष्ठांच्या आदेशाने दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. वैद्यकीय चाचणी अहवालानंतर दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सात मध्ये १८ ऑगस्ट २०२२ व ८ जानेवारी २०२३ रोजी दोन पोलिस नाईक यांच्याविरुद्ध कर्तव्यावर असताना मद्यपान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.