स्वच्छतेसाठी नगरपालिकेचा अमानवीय व्यवहार

स्वच्छतेसाठी नगरपालिकेचा अमानवीय व्यवहार

दौंड, ता. १४ : दौंड नगरपालिकेकडून सांडपाण्याच्या चेंबरची नियमित सफाई होत नसल्याने एका पावसातच अष्टविनायक मार्गालगतची दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरले होते. नगरपालिका प्रशासनाने सांडपाणी व गाळाने तुंबलेले चेंबर स्वच्छ केले पण त्यासाठी कंत्राटी सफाई
कर्मचाऱ्यांस थेट चेंबरमध्ये उतरवून अमानवी व्यवहार केला आहे.

दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून चेंबर तुंबले होते. परिणामी सांडपाणी आणि काल झालेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा न
झाल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत या मार्गालगत असलेली दुकाने आणि घरांमध्ये शिरले. सांडपाण्यामुळे कापड, किराणा व अन्य दुकानदारांचे माल खराब होऊन नुकसान झाले. याबाबत रहिवाशांनी तक्रार केल्यानंतर मुकादम काही सफाई कर्मचाऱ्यांना घेऊन सदर चेंबर स्वच्छ करण्यासाठी दाखल झाले.

नगरपालिकेच्या कंत्राटदाराने सफाई कर्मचाऱ्यास सहा फूट खोली असलेल्या या चेंबरमध्ये उतरविले. त्यामधून कर्मचाऱ्याने गाळ व कचरा काढून दिल्यानंतर सांडपाणीचा निचरा पूर्ववत झाला. परंतु स्वच्छतेसाठी आत उतरलेल्या कर्मचाऱ्याची फक्त मान व तोंडच सांडपाण्याच्या बाहेर होते. चेंबरच्या आत व बाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे गमबूट, हॅण्डग्लोव्हज, हेल्मेट, दोरखंड, शिडी, आदी सुरक्षा उपकरणे देणे आवश्यक असताना कोणत्याही सुरक्षा उपकरणाशिवाय उतरविण्यात आले होते.


नेमकं कसलं नियोजन करतात?
उन्हाळ्यातील एका पावसातच दौंड नगरपालिकेच्या गटारी तुंबून वाहू लागल्याने नगरपालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा उघडा पडला आहे. सांडपाणी साचणारी ठिकाणे आणि तुंबणाऱ्या गटारींची नगरपालिकेला माहिती आहे, परंतु फक्त जेथे तक्रार होते तेथीलच गाळ विलंबाने काढला जातो. त्यामुळे नगरपालिका प्रशासन पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांचे नेमके कसले नियोजन करते? हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.


चेंबरमधील सांडपाणी उपसण्यासाठी सक्शन यंत्र आहे पण त्याचा चालक रजेवर आहे. चेंबर मध्ये कामगारास उतरविणे चुकीचे असून, माहिती घेऊन त्याबाबत कंत्राटदाराला नोटीस काढली जाईल. पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू असून त्याची छायाचित्रासह नोंद करण्यात आली आहे.
- शाहू पाटील, आरोग्य विभागप्रमुख, दौंड नगर परिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com