दौंड शहरात बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी

दौंड शहरात बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी

दौंड, ता. ७ : दौंड शहरात पावसाचे पाण्याचे नियोजन करण्यात नगरपालिकेने ठोस उपाययोजना न केल्याने सलग दोन दिवस मुख्य बाजारपेठेतील दुकानांमध्ये व घरांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासन पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांचं नेमकं कसलं नियोजन करते? हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जाणाऱ्या अष्टविनायक मार्गाखालील आणि भंगाळे हॅास्पिटल समोरील भुयारी गटार योजनांतर्गत असलेले सांडपाण्याचे चेंबर तुंबलेले आहे. परिणामी सांडपाणी आणि ५ व ६ जून रोजी झालेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत या मार्गालगत असलेली दुकाने आणि घरांमध्ये शिरले. सांडपाण्यामुळे कापड, किराणा, आयुर्वेदिक औषधाचे दुकान आणि स्टेट बॅक शाखेमागील इमारत मधील नित्योपयोगी वस्तूंचे घाऊक व्यापारी व अन्य दुकानदारांचे माल खराब होऊन नुकसान झाले.

त्रस्त दुकानदारांनी दौंड नगरपालिका कार्यालयात जाऊन मुख्याधिकारी विद्या पोळ यांची ६ जून रोजी सकाळी भेट घेत त्यांच्यासमोर समस्या मांडल्या. दरवर्षी होणारा हा त्रास आणि त्यामुळे होणारे नुकसान आणि करावयाच्या उपाययोजनांविषयी मागणी केली. मुख्याधिकारी यांनी पावसाळा संपल्यानंतर निविदा काढून दुरुस्ती करण्याचे आश्वासन देत गाळ काढणे आणि अन्य कामे तातडीने करण्याची ग्वाही दिली. परंतु रात्री पुन्हा मुसळधार पाऊस झाल्याने सांडपाण्यासह पावसाचे पाणी दुकाने आणि घरांमध्ये शिरले.

शहरातील सांडपाणी साचणारी ठिकाणे आणि तुंबणाऱ्या गटारींची नगरपालिका प्रशासनाला माहिती आहे, परंतु फक्त जेथे तक्रार होते तेथीलच गाळ विलंबाने काढला जातो. नगरपालिका प्रशासनाला या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात स्वारस्य नसल्याने मुख्य बाजारपेठेतून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

नागरिकांच्या मागण्या :
■ शहरातील उघड्या गटारांमधील गाळ नियमितपणे काढणे.
■ जून ते आक्टोबर दरम्यान नियमितपणे गटार योजनेतील चेंबरमधील गाळ काढणे.
■ शिवाजी चौकात अष्टविनायक मार्गाखाली पाइप टाकून पाण्याचा निचरा करणे.
■ भंगाळे हॅास्पिटल, स्टेट बॅक व महादेव मंदिर परिसरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी गटार योजना करणे.
■ शहरातील सांडपाणी व पावसाचे पाणी साचणारी ठिकाणे नोंदवून उपाययोजना करणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com