दौंड मतदारसंघात मतदार माहिती चिठ्ठयांचे वितरण सुरू
दौंड, ता. १७ : दौंड विधानसभा मतदारसंघातील एकूण तीन लाख १९ हजार ३११ मतदारांना घरपोच मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वितरण सुरू झाले आहे. मतदारांची मतदान केंद्र व अनुक्रमांक शोधण्याची ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी निवडणूक प्रशासनाने या चिठ्ठ्यांचे वितरण केले आहे, अशी माहिती दौंड मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड यांनी दिली.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक प्रशासन विविध उपाय करीत आहे. दिव्यांग व ८५ वर्षांवरील नागरिकांसाठी गृह मतदान, निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता टपाली मतदान, दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर मतदारांना मतदान केंद्र शोधण्यासाठी ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी मतदार माहिती चिठ्ठ्या घरपोच वितरित केल्या जात आहेत.
दौंड तालुक्यात मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वितरण हे २९ क्षेत्रीय अधिकारी आणि ३१३ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केले जात आहे. संबंधित मतदान केंद्रांचे बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) यांच्यामार्फत मतदारांना मतदार चिठ्ठ्यांचे घरोघरी वाटप केले जात आहे. १५ नोव्हेंबरअखेर तीन लाख १९ हजार ३११ मतदारांपैकी एकूण दोन लाख पाच हजार ६५ मतदारांना मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वितरण केले. १९ नोव्हेंबरपर्यंत वितरणाचे कार्य पूर्ण केले जाणार आहे. या मतदार चिठ्ठ्यांवर मतदारांचे नाव, मतदार ओळखपत्र क्रमांक, मतदार यादीतील अनुक्रमांक, मतदान केंद्राचे ठिकाण, मतदानाची तारीख व वेळ याची माहिती टंकलिखित केली आहे.
मतदान केंद्रासाठी क्विक रिस्पॉन्स कोड
मतदार माहिती चिठ्ठीवर मतदान केंद्राच्या ठिकाणचा क्विक रिस्पॉन्स (क्यूआर कोड) कोड छापण्यात आला आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित मतदारांना त्यांचा मतदार ओळखपत्र क्रमांक, वैयक्तिक तपशील किंवा मोबाईल क्रमांक, यापैकी एकाची माहिती भरल्यानंतर एका क्लिकवर मतदान केंद्राची माहिती उपलब्ध होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

