राष्ट्रसेवेसाठी सदैव सज्ज राहावे
दौंड, ता. ४ : ‘‘मूलभूत प्रशिक्षण पूर्ण करून राज्य राखीव पोलिस दलात प्रविष्ट झालेल्या अंमलदारांनी सायबर गुन्हे अन्वेषण व अन्य प्रशिक्षण घेत स्वत: ला ज्ञान - तंत्रज्ञानाविषयी अद्ययावत ठेवावे. संकटे अनेक आहेत, परंतु सेवाकाळातील निरंतर प्रशिक्षणाद्वारे त्यावर मात करीत राष्ट्रसेवेसाठी सदैव सज्ज राहावे,’’ असे आवाहन राज्य राखीव पोलिस दलाचे उपमहानिरिक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.
दौंड शहरात शुक्रवारी (ता. ४) राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाचवरील मैदानावर ६८ - अ या सत्राच्या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारल्यानंतर बोलताना मगर यांनी आवाहन केले. यावेळी नानवीज (ता. दौंड) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य नंदकुमार ठाकूर व सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र केंडे आदी उपस्थित होते. राष्ट्रध्वजाला साक्ष ठेवत गट क्रमांक पाचचे समादेशक सोमनाथ वाघचौरे यांनी या सत्रात उत्तीर्ण झालेल्या २५९ नवप्रविष्टांना कर्तव्याची शपथ दिली. नवप्रविष्ट अंमलदार जीवन कळमकर यांनी शिस्तबद्ध संचलनाचे नेतृत्व केले.
नानवीज येथील राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात यंदा क्षमतेपेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी दाखल झाल्याने दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाचमध्ये २५९ जणांना प्रशिक्षण दिले. गटाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच दौंड येथे नवप्रविष्ठांचे दीक्षांत संचलन पार पडले. पोलिस निरीक्षक प्रफुल्ल खडपकर व हवालदार सचिन देवडे यांनी सूत्रसंचालन केले.
अजय चव्हाण सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी
पुणे येथील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक दोनमधील नवप्रविष्ट अजय चव्हाण यांनी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार मिळविला. आंतरवर्ग परीक्षेत अजय चव्हाण व स्वप्नील भोरे यांनी अनुक्रमे पहिले दोन क्रमांक, बाह्यवर्ग परीक्षेत प्रतीक जाधव व मेहमूद शेख यांनी अनुक्रमे पहिले दोन; तर कमांडो परीक्षेत प्रतीक जाधव व राहुल शिरसाट यांनी अनुक्रमे पहिले दोन क्रमांक पटकावले. उत्तम गणवेशाचा पुरस्कार जीवन तळणकर, उत्तम नेमबाजचा पुरस्कार अभिजित सोनसळे यांनी पटकावला. तसेच प्रथमोपचाराचा पुरस्कार सचिन कदम यांनी पटकावला.
नवप्रविष्टांसाठी विजयकुमार मगर यांचे आवाहन
- राष्ट्रध्वजाच्या साक्षीने कर्तव्याची शपथ घेतल्याचे सदैव भान ठेवा.
- आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा.
- उत्तम आरोग्य राखा, निर्व्यसनी जीवन जगा.
- कुटुंबीयांच्या चुकीच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करा.
- मद्य, ऑनलाइन जुगार व अमली पदार्थांपासून दूर राहा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.