दौंडला होड्यांमध्ये बसून विसर्जन

दौंडला होड्यांमध्ये बसून विसर्जन

Published on

दौंड , ता. ७ : दौंड शहरात गणरायाला भक्तीमय वातावरणात ‘पुढच्या वर्षी लवकर या...’च्या जयघोषात भावपूर्ण निरोप देण्यात आला. निरोप देताना गणेशभक्तांचे डोळे पाणावले होते. होड्यांमध्ये बसून भाविकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले.
दौंड शहरात शनिवारी (ता. ६) भीमा नदीतीरी सकाळपासून घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन केले. खडकवासला धरणसाखळीतील धरणांमधून पाणी सोडल्याने नदी दुथडी भरून वाहत होती. नागरिक सहकुटुंब नदीतीरी जमा झाले होते व त्यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. आरती झाल्यानंतर लाडक्या गणरायाला निरोप देताना आबालवृद्धांचे डोळे पाणावले होते. नदीतीरावर लाकडी व लोखंडी होड्यांमध्ये बसून भाविकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. पारंपरिक पद्धतीने विसर्जनाचा सोहळा पार पडत असताना उत्साहाला उधाण आले होते.
काही गणेशोत्सव मंडळांनी मिरवणुकीत ढोल व ताशा पथक, लेझीम पथक व हलगी वादकांना आमंत्रित करून गुलालविरहित मिरवणुका काढल्या. महात्मा गांधी चौकात शिवसेनेच्या माजी नगरसेविका अनिता गणेश दळवी यांच्या पुढाकाराने सलग दहाव्या वर्षी गणेशभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. वीरधवल जगदाळे पाटील यांच्या पाटील वाड्यातील गणेशमूर्तीची पालखीतून मिरवणूक काढून विसर्जन केले. या पालखीसमोरील ग्रामस्थांच्या लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधले होते.

बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी
पुणे येथील बॉम्ब शोधक व नाशक पथकाने दौंड शहरातील विसर्जन मार्ग, प्रमुख चौक, नदीतीर व होड्यांची बारकाईने तपासणी केली. विसर्जनासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मिरवणुकीची वैशिष्ट्ये
- गुलाल, भंडारा व टाल्कम पावडरची मुक्त उधळण
- काही मंडळांकडून कर्णकर्कश डीजे आणि ध्वनीवर्धकांचा अमर्याद वापर
- नदीतीरावर क्रेनची व्यवस्था केल्याने आकाराने मोठ्या व उंच अशा गणेशमूर्ती वाहनातून उतरविणे सुसह्य
- आरतीनंतर पुन्हा गणेशमूर्ती क्रेनच्या साह्याने उचलून थेट होडीत ठेवली जात असल्याने मंडळांची सोय होऊन वेळेची बचत
- पोलिसांकडून रात्री ठीक बारा वाजता सर्व डीजे संच बंद
- मध्यरात्री दीड वाजता शेवटच्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन

दौंड : भीमा नदी पात्रात होडीच्या साह्याने गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com