नागरकोईल एक्सप्रेसमध्ये चोरी
दौंड, ता. ८ : मुंबई - नागरकोईल एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेकडील सोनसाखळीसह एकूण ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.
बदलापूर येथील शालिनी प्रशांत प्रजापती या मुंबई-नागरकोईल एक्स्प्रेसने ३ सप्टेंबर रोजी कल्याण ते मदुराई असा प्रवास करीत होत्या. प्रवासाच्या दरम्यान एक्स्प्रेस दौंड रेल्वे स्थानकावर मध्यरात्री अडीच वाजता दाखल झाल्यानंतर त्या झोपेतून उठल्यावर त्यांना त्यांची पर्स चोरीस गेल्याचे लक्षात आले. पर्समधील सोनसाखळी, मोबाईल संच, रोख रक्कम, असा एकूण ४७ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत शालिनी प्रशांत प्रजापती (रा. बदलापूर, मुंबई) यांनी धावत्या नागरकोईल एक्सप्रेसमधील चल तिकीट परीक्षक (टीटी) यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. यासंबंधी ऑनलाइन तक्रार व आवश्यक कागदपत्रे ईमेल द्वारे पुणे लोहमार्ग पोलिस दल मुख्यालयास प्राप्त झाल्यानंतर हा चोरीचा गुन्हा तपासाकरिता दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यात या प्रकरणी शुक्रवारी (ता. ५) अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.