सत्ता आहे म्हणून मस्ती दाखवू नका
दौंड, ता. १८ : ‘‘राज्यघटनेने प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला असल्याने दौंड तालुक्यातील पोलिस व अन्य शासकीय विभागांनी नियमानुसारच नागरिकांची कामे करावीत. सत्ता आहे म्हणून मस्ती दाखवू नये. कोणाच्या सांगण्यावरून खोटे गुन्हे आणि चुकीची कामे न करता, जे करायचे ते नियमानुसारच करावे,’’ अशी ताकीद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळा व संवाद मेळाव्यात अजित पवार यांनी ही ताकीद दिली. माजी आमदार रमेश थोरात, दौंड शुगर कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे, प्रवक्ता वैशाली नागवडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, आदी उपस्थित होते. भाजपचे माजी शहराध्यक्ष स्वप्नील शहा, माजी नगरसेवक नंदकुमार पवार, माजी सरपंच मनोज फडतरे यांनी समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
अजित पवार म्हणाले, ‘‘सरकारे येतात आणि जात असतात. सगळेच जण आहे त्याच ठिकाणी राहतात, अशातला भाग नाही. जसे चार दिवस सासूचे तसे चार दिवस सुनेचे असतात, हे दौंड तालुक्यातील शासकीय विभागांनी लक्षात ठेवावे. सत्यता पाहूनच कारवाई करावी. हीच गोष्ट बाकी खात्यांनाही लागू आहे. आपल्याकडून लोकांची कामे होतात का नाही, हे तपासून दर्जेदार विकासकामे कशी पूर्ण होतील, याचा विचार करायचा असतो. कृत्रिम बुद्धिमता व गुणवत्तेला महत्त्व आहे व त्याचा कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी वापर होत आहे. विकासकामे करताना नुसता निधी आणून भागत नाही तर त्यासाठी कामाच्या ठिकाणी जाऊन दर्जेदार काम करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात.’’
या वेळी स्वप्नील शहा यांनी अजित पवार यांच्याकडे पूरग्रस्त मदत निधी म्हणून १ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. रवी पवार यांनी सूत्रसंचालन केले.
‘‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून योग्य उमेदवारांसह तरुण व अनुभवींना संधी दिली जाईल. पक्षात प्रवेश करणाऱ्यांना ‘आगीतून उठलो आणि फुफाट्यात पडलो’ असे वाटण्याची वेळ मी येऊ देणार नाही. मी कामाचा व शब्दाचा पक्का माणूस आहे. माझ्या संस्थांचा कारभार उत्तम सुरू आहे. राज्याचा लौकिक वाढविण्यासाठी मला साथ द्या, मी कुठे कमी पडणार नाही,’’ असे आवाहन अजित पवार यांनी केले.
DND25B04143
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.