भाजप, राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला

भाजप, राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला

Published on

भाजप, राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला

दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते प्रेमसुख कटारिया यांच्या नेतृत्वातील नागरिक हित संरक्षण मंडळाचे पॅनेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष व महाविकास आघाडी, अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यात मतविभाजनाच्या दृष्टीने उमेदवार देण्यासाठी सावध चाचपणी सुरू आहे.

- प्रफुल्ल भंडारी, दौंड

दौंड नगरपालिकेत पूर्ण ताकदीने पॅनेल उभे करून ते निवडून आणण्यासाठी प्रदेश कार्यकारिणी भाजपचे आमदार राहुल कुल यांच्याकडे आग्रही आहे. त्यांची दौंड शहरातील सर्व मदार माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या खांद्यावर आहे. कटारिया मात्र नागरिक हित संरक्षण मंडळाच्या माध्यमातून शहरातील सामाजिक रचना, जातीय व राजकीय समीकरणे व उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता विचारात घेता पुन्हा स्वतःचे पॅनेल उभे करणार आहेत. ते ‘कमळ’ चिन्ह स्वीकारणार नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे राहुल कुल नेमकी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागलेले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार) माजी आमदार रमेश थोरात यांची घरवापसी झाल्यानंतर भाजपचे माजी शहराध्यक्ष स्वप्नील शहा, माजी नगरसेवक नंदकुमार पवार यांचा प्रवेश झाला. माजी नगराध्यक्ष वीरधवल जगदाळे व त्यांचे बंधू तथा माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे यांनी शहरात पक्षाची संघटनात्मक बांधणी करीत बेरजेचे राजकारण केल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंड शहरातील जाहीर सभेत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देण्याचे जाहीर भाष्य करीत चांगले उमेदवार निवडून देण्याचे आवाहन केले आहे. महाविकास आघाडी व भाजपसह अन्य पक्षांचे उमेदवार किती मते घेतात, यावर अनेकांचे यश अवलंबून आहे.

नगराध्यक्षपदाच्या उमेदवार
नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला वर्गासाठी राखीव असून, नागरिक हित संरक्षण मंडळाकडे डझनभर इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडे चाचपणी सुरू आहे. महाविकास आघाडीची देखील चाचपणी सुरू आहे. भाजपचे पूर्ण पॅनेल होण्याविषयी शंका असल्याने नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची तूर्त चर्चा नाही. नवीन चेहऱ्यांसह काही माजी नगराध्यक्षा व नगरसेविका देखील चाचपणी करीत आहेत.

मागील वेळेचे पक्षीय बलाबल
डिसेंबर २०२६ मध्ये झालेल्या नगराध्यक्षपदाच्या चुरशीच्या निवडणुकीत प्रेमसुख कटारिया यांच्या धाकट्या सूनबाई शीतल योगेश कटारिया यांनी १२० मतांच्या फरकाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नंदकुमार पवार यांचा पराभव केला होता. तर २४ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शिवसेना युतीचे १४ व नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडीचे १० सदस्य निवडून आले होते.

स्थानिक समस्या
• स्वच्छतेसाठी दिवसाला एक लाख खर्च तरी शहरात सर्वत्र कचरा व दुर्गंधी
• एकही उद्यान, सभागृह, नाट्यगृह, बालोद्यान, चित्रपटगृह, सुलभ शौचालय नसलेले शहर
• सप्टेंबर २०१५ पासून दिवसाआड फक्त एक वेळ दूषित व कमी दाबाने पाणीपुरवठा
• बाह्यवळण रस्ता कागदावरच असल्याने शहरातून अवजड वाहतूक
• नगरपालिकेचे स्वतंत्र कार्यालय नाही.
• साडेचार वर्षात तब्बल पाच मुख्याधिकाऱ्यांची बदली
• राज्याकडून आलेल्या निधीच्या विनियोग व ठेकेदारांना दिलेल्या मुदतवाढी शंकास्पद
• कर वसुली ठप्प
• नगरपालिकेच्या इमारती विनावापर पडून. उत्पन्न वाढीसाठी ठोस प्रयत्न नाहीत.
• छोट्या पावसानंतरही मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर पाणी तुंबण्याचे प्रकार.
• भाड्याच्या जागेत कचरा टाकला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com