सिलिंडर स्फोटामधील पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू
दौंड , ता. १६ : दौंड-पाटस अष्टविनायक मार्गावरील हॅाटेल जगदंबामध्ये घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोटाप्रकरणी भाजलेल्या सहा जणांपैकी पाच कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका १४ वर्षीय अल्पवयीन स्वयंपाकीचा देखील समावेश आहे.
स्वयंपाकी कुकरन कलमसिंग निषाद ( वय १४, रा. फुसापुरा, जि. आग्रा ), स्वयंपाकी मणिराम अत्तरसिंह वर्मा (वय २१, रा. हिमायूंपुर इदोइन, जि. आग्रा), हॅाटेल मधील कर्मचारी कन्हैया बंगालीराम वर्मा (वय २०, हिंगोट खेरिया, जि. आग्रा), रामप्रकाश कालिचरण वर्मा (वय २४, रा. नगरिया, जि. आग्रा) व दीपक भूपसिंग वर्मा (वय २५, निबोहरा, फतेहाबाद, जि. आग्रा) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर हॅाटेलमधील मदतनीस असलेला ब्रिजमोहन पुरुषोत्तम वर्मा (वय १९, रा. नत्था, खैरडांडा, जि. आग्रा) यांच्यावर आग्रा येथे उपचार सुरू आहेत . दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ पवार यांनी शुक्रवारी (ता. १६) याबाबत माहिती दिली. गिरिम (ता. दौंड) हद्दीतील मांढरे मळा येथील हॅाटेल जगदंबामध्ये बुधवारी (ता. ७) दुपारी भटारखान्यातील एका घरगुती वापराच्या सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. त्यामुळे ग्राहकांसाठी जेवण करण्याच्या तयारीत तेथे असलेले दहा हॅाटेल कर्मचारी भाजले होते. त्यापैकी गंभीररीत्या भाजलेल्या सहा जणांना पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर अन्य चौघांवर दौंड शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले होते. दरम्यान, गंभीररीत्या भाजलेल्या सहा जणांना ससून रुग्णालयातून त्यांच्या मूळ गावी रुग्णवाहिकेद्वारे शनिवारी (ता. १०) रुग्णांच्या नातेवाइकांनी केलेल्या मागणीनुसार स्थलांतरित करण्यात आले होते.
हॉटेलमालकासह व्यवस्थापकावर मनुष्यवधाचा गुन्हा
सिलिंडर स्फोटप्रकरणी हॅाटेल मालक किरण आबा सौताडे व व्यवस्थापक लहू विश्वनाथ जानभरे ( दोघे रा. राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध पाच कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाल्यानंतर सदोष मनुष्यवधाचा कलम वाढविण्यात आला आहे. भारत पेट्रोलियम कॅार्पोरेशन लिमिटेड, पुरवठा शाखा, कामगार आयुक्त कार्यालय, विद्युत विभाग, आदींकडून स्फोटाचा तपास सुरू आहे. या स्फोटाशी संबंधित सर्व जणांवर प्राप्त अहवालानुसार कारवाई होईल, अशी माहिती तपास अधिकारी अब्दूल बिद्री यांनी दिली.
दहा दिवसानंतरही कारवाई नाही
स्फोटानंतर हॅाटेलचा मालक किरण सौताडे व व्यवस्थापक लहू जानभरे फरार आहेत. स्फोट होऊन दहा दिवस उलटल्यानंतरही पोलिसांकडून या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नाही. स्फोटानंतर या हॅाटेलमध्ये विना परवाना घरगुती वापराचे १० व वाणिज्य वापराचे १२, असे एकूण २२ एलपीजी गॅस सिलिंडरचा साठा आढळून आला होता; परंतु या गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या टोळीवर दहा दिवसानंतरही कोणतीही कारवाई झालेली नाही.

