दौंडमध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ
प्रफुल्ल भंडारी : सकाळ वृत्तसेवा
दौंड, ता. २० : दौंड शहर आणि परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला असून, दररोज सरासरी १० नागरिकांना कुत्रे चावा घेत आहेत. नगरपालिकेची निर्बीजीकरण यंत्रणा कुत्र्यांच्या वाढत्या संख्येपुढे अपुरी पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दौंड शहरात नियमित स्वच्छतेचा अभाव असल्याने शहरातील एकही भाग असा नाही जेथे कुत्र्यांचा उपद्रव नाही. घंटागाड्या नियमित येत नसल्याने जागोजागी कचरा साठल्याने तेथे कुत्र्यांचे टोळके वावरत असल्याने नागरिकांना पायी किंवा वाहनावरून जाणे जिकिरीचे झालेले आहे. शहराच्या प्रवेसीमार्गांवर देखील भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे दररोज किरकोळ अपघात होत आहेत. दौंड हे मध्य रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन असल्याने लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्या थांबतात. गाड्या थांबल्यावर प्रवाशांकडून लोहमार्गालगत कचरा टाकणे व शिळे अन्न टाकण्याचे प्रमाण मोठे असल्याने उघड्यावरील अन्न खाण्यासाठी रेल्वे स्थानक व स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर कुत्र्यांच्या टोळ्या आहेत. शहरातील मांस विक्री केंद्र आणि हॉटेलमधील शिल्लक अन्न जेथे टाकले जाते तेथे कुत्र्यांचे प्रमाण अधिक आहे. शहरात भटकी कुत्री पकडल्यावर ती सोडून देण्यासाठी काही निवडक तरुण व तरुणी संबंधितांवर दबाव आणतात त्यामुळे वादाचे प्रसंग घडत आहेत. दाट लोकवस्ती असलेल्या काही भागांमध्ये नगरपालिका प्रशासनाला कुत्रे पकडण्याच्या मोहिमेत सहकार्य न करता आडकाठी आणली जाते. दौंड रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गांवर काही तरुण हे कुत्र्यांना सोईने मांस खाऊ घालत असल्याने त्या भागातील कुत्री हिंसक झाली असून प्रत्येकाच्या अंगावर धावून जात आहेत.
एका कुत्र्यावर १८०० रुपये खर्च
दौंड - सिद्धटेक अष्टविनायक मार्गाजवळ नगरपालिकेचे बंद असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाजवळ पकडलेल्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्र सुरू केले आहे. लसीकरण व निर्बीजीकरण करण्यासाठी शल्यक्रियागार सुरू आहे. नगरपालिका प्रशासन एका कुत्र्याला धरून त्याचे निर्बीजीकरण करण्यासाठी १८०० रुपये खर्च करीत आहे.
१ एप्रिल २०२५ ते १५ मार्च २०२६ : ३६३९ जणांना चावा
नागरिकांच्या मागण्या
शहरातील वैध व अवैध मांस विक्री केंद्रांसमोरील व परिसरातील कुत्र्यांचे निर्बीजीकरण प्राधान्याने करावे.
नगरपालिकेने ठराविक भाग स्वच्छ करण्यापेक्षा सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवून नित्यनियमाने कचरा संकलन करावे.
कुत्र्यांसाठी शिळे अन्न रस्त्याच्या कोपऱ्याला ठेवणाऱ्या नागरिकांवर कारवाई व्हावी.
उघड्यावर खराब मांस टाकणाऱ्या विक्रेत्यांवर सतत कारवाई व्हावी.
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत पोल्ट्रीमधील कचरा टाकणाऱ्या कुक्कुटपालन व्यावसायिकांवर कारवाई करावी.
अंगणवाड्या, विद्यालये, भाजी मंडई आणि वर्दळीच्या चौकांकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील कुत्र्यांचे निर्बीजीकरण करावे.
भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या व त्यांचा उपद्रव भीषण आहे. कुत्र्याने घेतलेल्या चाव्याचे वाढते प्रमाण पाहता निर्बीजीकरण करावे. भटक्या कुत्र्यांचे दौंड शहरातील व शहराला लागून असलेल्या राखीव वन क्षेत्रातील उपद्रव रोखण्यासाठी सर्व संबंधितांनी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या पाहिजेत.
- प्रल्हाद जाधव, वन्यजीव अभ्यासक
मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पकडलेल्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे. कुत्र्यांचे लसीकरण व निर्बीजीकरण करण्यासाठी शल्यक्रियागार सुरू आहे. ६० कुत्र्यांवर पशुवैद्यकीय चिकित्सकांकडून निर्बीजीकरण करण्यात आले आहे.
- शाहू पाटील, आरोग्य विभाग, दौंड नगरपालिका
कुत्रा चावल्यानंतर दौंड उपजिल्हा रुग्णालयात उपचार व लसीकरणासाठी येणारे ९० टक्के रूग्ण दौंड शहर व परिसरातील आहेत. कामावर जाणाऱ्या प्रौढांना रात्री व मध्यरात्री कुत्रे चावण्याचे प्रमाण अधिक आहे. पाळीव कुत्र्यांकडून त्यांचा सांभाळ करणाऱ्यांचा खेळता-खेळता चावा घेण्याचे प्रमाण देखील लक्षणीय आहे. रुग्णालयात लशींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
- डॉ. सचिन गुजर, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, दौंड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

