दौंडमध्ये गोहत्या करणारे तिघे हद्दपार
दौंड, ता. २३ : दौंड शहर व परिसरात गोहत्या करून गोमांसाची वाहतूक व विक्री करणाऱ्या टोळीतील तीन जणांवर पुणे ग्रामीण पोलिस दलाने हद्दपारीची कारवाई केली.
याबाबत दौंड पोलिसांनी माहिती दिली की, गोहत्या करणे, कारवाईसाठी आलेल्या पोलिस पथकाला अडविणे व गायींना कत्तलीसाठी डांबून ठेवणारे हसन कुरेशी, जमिल कुरेशी व फैजान कुरेशी यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ पवार यांनी पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक यांच्याकडे सादर केला होता. तिघांपैकी हसन उर्फ लड्डू लाला हाशमी कुरेशी व त्याच्या अन्य सतरा साथीदारांनी १ डिसेंबर २०२३ रोजी कारवाईसाठी आलेल्या पोलिस पथकाला अडवून पोलिसांना धक्काबुक्की केली होती. तसेच गोरक्षक आकाश भैसडे यास बेदम मारहाण केली होती.
दरम्यान, पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी या हद्दपारीच्या प्रस्तावावर सुनावणी घेतली. गोहत्या करणाऱ्या टोळीचा सदस्य हसन उर्फ लड्डू लाला हाशमी कुरेशी (वय २२), जमिल इस्माईल कुरेशी (वय २४) व फैजान अब्दूल कुरेशी (वय ३८, तिघेही रा. खाटीक गल्ली, दौंड) यांना दोन वर्षाकरिता हद्दपार केले आहे. पुणे ग्रामीण पोलिस हद्दीतील दौंड, बारामती, हवेली व इंदापूर तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका हद्दीतून तिघांना हद्दपार केल्याचे आदेशात नमूद केले आहे.
हद्दपार केलेल्या तिघांपैकी हसन कुरेशी याच्याविरूद्ध एकूण १० गुन्हे दाखल आहेत. तर, तिघांवर गोहत्या करणे, गोमांसाची वाहतूक व विक्री करणे, कत्तलीसाठी गायींनी डांबणे, आदी प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
पावणेतीन वर्षानंतर कारवाई
पुणे ग्रामीण पोलिस दलाचे तत्कालीन अधीक्षक अंकित गोयल यांनी गोहत्या करणाऱ्या दौंड शहरातील एका टोळीच्या सात जणांना ६ मे २०२३ रोजी एका वर्षाकरिता हद्दपार केले होते. राज्य शासनाने ३० सप्टेंबर २०२४ रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून गायींना ‘राज्यमाता- गोमाता’ म्हणून घोषित केलेले आहे. तरीदेखील दौंड शहर व परिसरात गायींची कत्तल राजरोसपणे सुरू आहे. आधी झुडपे किंवा निर्मनुष्य भागात होणारी गोहत्या आता उघड्यावरच होत असल्याने टोळीवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली. त्यानुसार अन्य एका टोळीतील तीन जणांना पोलिस दोन वर्षाकरिता हद्दपार केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

